

कोल्हापूर : ओडिशा राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये होलसेल गांजा पुरवणार्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत आठ जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल 41 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने, एक बुलेट मोटारसायकल आणि 10 मोबाईल असा 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, हातकणंगले ते कुंभार रस्त्यावरील नेज येथे गांजा विक्री होणार असल्याची खबर लागली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दीपक पुजारी, विवेक शिंदे आणि अंकुश शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 21 किलो 70 ग्रॅम गांजासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी खरसुंडी (जि. सांगली) येथे छापा टाकून मनोज गोसावी, राजू शेख, महेश साळुंखे आणि देवदास तुपे यांना अटक केली. त्यांच्याकडून आणखी 20 किलो 125 ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नंदकिशोर साठे यालाही अटक केली. आठही जणांविरुद्ध हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिस पथके ओडिशाला रवाना होणार आहेत.
संशयितांनी ओडिशातून रेल्वेतून पिशव्याभरून गांजा आणून, नंतर चारचाकीतून कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत होलसेलमध्ये विक्री केली जात होती.