Gokul Election | शिरोली दुमाला ८४, घोटवडेत ३२ ठरावधारक; कार्यक्षेत्राबाहेरील सर्वाधिक ठराव दोन ज्‍येष्‍ठ संचालकांच्‍या गावात

Gokul Election |
कोल्‍हापूर : सहायक निबंधक कार्यालयात शुक्रवारी हरकत घेतलेल्‍या अंतिम ३१० संस्‍थांची सुनावणी पूर्ण झाली. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’च्‍या प्रारूप मतदार यादीत कार्यक्षेत्राबाहेरील ठरावांवर हरकती घेण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये सर्वाधिक ठरावधारक हे ‘गोकुळ’च्‍या दोन ज्‍येष्‍ठ माजी संचालकांच्‍या गावांतील आहेत. करवीर तालुक्‍यातील शिरोली दुमालात ८४, तर राधानगरी तालुक्‍यातील घोटवडे गावात सर्वाधिक ३२ ठरावधारक आहेत. शिरोलीत ७२ तर घोटवडेतील २७ जणांच्‍या नावे तालुक्‍यातील अन्‍य गावांमधील दूध संस्‍थांचे ठराव केले आहेत. कागल शहरातही १४ ठराव अशा पद्धतीचे असल्‍याचे समजते.

‘गोकुळ’च्‍या प्रारुप मतदार यादीवर घेतलेल्‍या ५९५ हरकतींची सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. सुनावणीमध्‍ये दूध संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्राबाहेरील ३९४ आणि ‘गोकुळ’ कर्मचार्‍यांच्‍या नावे असलेल्‍या सुमारे १८४ ठरावांवर हरकती घेण्‍यात आल्‍या. सुनावणीमध्‍ये या हरकतींचा मुद्दाच सर्वाधिक गाजला. कार्यक्षेत्राबाहेरील ३९४ ठरावांपैकी सुमारे ११६ ठराव हे शिरोली दुमाला आणि घोटवडे गावातील आहेत. यापैकी बहुतांश ठरावांवर हरकत घेतली असल्‍याने या ठरावधारकांबाबत जिल्‍हा निवडणूक अधिकारी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असणार आहे.

३१ पर्यंत निकाल; ४ सप्‍टेंबरला अंतिम यादी

प्रारूप यादीवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली. शनिवारी अंतिम ३१० हरकतींची सुनावणी विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांनी पूर्ण केली. सुनावणीचा निकाल त्‍यांना ३१ ऑगस्‍टपर्यंत द्यायचा आहे. तर, ४ सप्‍टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

गावात संस्‍था १२ अन् ठरावधारक ८४

शिरोली दुमाला गावात दूध संस्‍था १२ अन् ठरावधारक ८४ आहेत. तर, घोटवडे गावात दूध संस्‍था पाच अन् ठरावधारक ३२ आहेत. त्‍यामुळे या दोन्‍ही गावांतील ठरावांची संख्‍या तालुक्‍यात चर्चेत आली आहे. शिरोली दुमालातील ८४ पैकी ८१ ठरावधारकांच्‍या नावे करवीर तालुक्‍यातील विविध गावांमधील दूध संस्‍थांचे ठराव आहेत. तर, तालुक्‍याबाहेरील चंदगडमधील दोन आणि शिरोळ तालुक्‍यातील एका दूध संस्‍थेचा ठरावधारक हा शिरोली दुमालातील आहे. घोटवडेतील ३२ पैकी २९ दूध संस्‍था या राधानगरी तालुक्‍यातील आहेत. तर, शाहूवाडी, शिरोळ, करवीर तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एका दूध संस्‍थेचा ठरावधारक घोटवडेमधील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news