

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : राज्यात मतदारयादीतील गोंधळावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अनेक मतदारसंघांतील नावे गायब होणे, एका प्रभागातील नावे दुसर्या प्रभागात असणे, यावरून सुरुवातीला विरोधी पक्षांनी आरोप केले. नंतर मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही विरोधी आमदारांच्या सुरात सूर मिसळत हेच आरोप केल्याने विरोधकांच्या मुद्द्याला बळ आले.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत मतदारयादीचे काम, त्यावर आलेल्या हरकती किती? हरकती दाखल होण्याचे प्रमाण काय? बुधवार हा मतदारयादीवर हरकती घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या शेवटच्या दिवसापर्यंत आलेल्या हरकती किती? त्याचा निपटारा किती प्रमाणात करण्यात आला आहे? हरकतींचे सर्वसाधारण स्वरूप काय? व या यासंदर्भात दाखल झालेल्या हरकतींचा निपटारा कधीपर्यंत होणार? या प्रश्नांची उत्तरे बैठकीतून निवडणूक आयोगाला अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
त्यातच नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका होऊनही मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
या सर्व पार्श्वभूमीवर होणार्या निवडणूक आयोगाच्या बैठकीला फार महत्त्व आहे. राज्यभर सत्ताधारी व विरोधकांकडून ज्या मतदारयादीवर आक्षेप घेण्यात आले त्यावर निवडणूक आयोग सर्व महापालिका प्रशासकांकडून तपशीलवार माहिती घेणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी या सर्व बाबी काटेकोरपणे तपासून आरोपांना जागा राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. मतदारयाद्या तयार करून त्यांची अंतिम प्रसिद्धी करताच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने या बैठकीला कमालीचे महत्त्व आहे.