

कवठेगुलंद, पुढारी वृत्तसेवा : नृसिंहवाडी - औरवाड पुलावर पुन्हा एकदा मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात नृसिंहवाडीतील आकाश नाईक आणि त्यांची आई वत्सला नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कुरुंदवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Bee Attack)
वत्सला नाईक पूल ओलांडत असताना मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आईला वाचवण्यासाठी आकाश नाईक धावून आला असता मधमाशांनी त्याच्यावरही हल्ला केला. या भीषण प्रसंगात दोघांनाही अनेक ठिकाणी चावे बसले आणि त्यांची प्रकृती बिघडली. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
गेल्या काही महिन्यांपासून या पुलावर मधमाशांचे हल्ले सातत्याने वाढत असून, स्थानिक प्रशासन आणि औरवाड ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्धांसाठी ही समस्या गंभीर बनली आहे.
प्रशासनाने त्वरित पावले उचलून या मधमाशांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.