

महादेव शहापुरे
कवठेगुलंद : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) दत्तनगरी म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या येथील बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून विविध गैरसोयींमुळे नागरिक व भाविक त्रस्त झाले आहेत. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतानाही बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे. तसेच अस्वच्छ परिसर, बंद पडलेले पंखे, अपुरी प्रकाशयोजना, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि कंपाऊंडची मोडकळीस आलेली अवस्था यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
उन्हाच्या तीव्रतेत पाण्यासाठी प्रवाशांना भटकंती करावी लागत आहे. बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच बसस्थानक परिसरातील कंपाऊंड अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या लाईट व्यवस्थेमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या; मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकातील समस्या तातडीने सोडवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष...
बसस्थानकात पिण्याचे पाणी, स्वच्छता, पंखे, लाईट, स्वच्छतागृहांची दुरवस्था तसेच कंपाऊंडच्या खराब अवस्थेमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.