

कोल्हापूर : तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी अखेर मंगळवारपासून सुरू होत आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. मात्र, अद्याप दोघांनीही उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत.
येत्या दोन-तीन दिवसांत त्या जाहीर होतील, अशीही शक्यता आहे. महापालिकेच्या नगरसेवकांच्या 81 जागांसाठी 20 प्रभागांत निवडणूक होणार आहे. त्याकरिता प्रभागनिहाय सात निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. या कार्यालयात मंगळवार, दि. 23 ते बुधवार, दि. 30 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी महापालिका, पोलिस प्रशासन, निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचार्यांकडून तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी याबाबत प्रशासनाने संयुक्त बैठक घेत संबंधितांना सूचना दिल्या. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत असून, यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.
महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशीच लढत होणार असून त्यातील घटक पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यानुसार आपल्या संभाव्य याद्या आणि त्यानुसार अधिकाधिक जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक उमेदवारनिहाय महायुती आणि महाविकास आघाडीत काथ्याकूट सुरू आहे. त्यामुळे घटक पक्षांची मागणी आणि परिस्थिती यानुसार जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अंतिम झालेला नाही. परिणामी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी अंतिम झालेली नाही.
कोल्हापूर महापालिकेच्या 20 प्रभागांतून एकूण 81 सदस्यांची निवड होणार आहे. यंदा प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान होणार असल्याने मतदारांसह उमेदवारांमध्येही याबाबत उत्सुकता आहे. पक्षाची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी अखेरच्या क्षणी गडबड होण्याचीही शक्यता आहे. यामुळे काहींनी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे.
धाकधूक वाढली
महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपावरून डोकेदुखी वाढली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर त्यानुसार उमेदवारी वाटप करणे हे एक नेत्यांसमोरील मोठे टेन्शन आहे. त्यातून बंडखोरीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे अखेरच्या क्षणीही अनेक उलथापालथी होण्याची शक्यता असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी दोन-तीन दिवसानंतरच जाहीर होईल, अशीही शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल : 23 ते 30 डिसेंबर
अर्ज छाननी : 31 डिसेंबर
अर्ज माघार : 2 जानेवारी (दुपारी तीन पर्यंत)
मतदान : 15 जानेवारी
मतमोजणी : 16 जानेवारी