

कोल्हापूर : अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जाबाबत दोन दिवस मोठ्या थाटामाटात प्रात्यक्षिक घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू केलेल्या शिक्षण विभागाच्या वेबसाईटचा बुधवारी पहिल्याच दिवशी बोर्या वाजल्याने जिल्ह्यात अकरावी प्रवेश अर्जाची एकही नोंदणी झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाची समस्या राज्यभर असल्याने माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे गुरुवारी दुपारी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या फेरी क्रमांक एकचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरता येणार होता. त्यासाठीची हीींिीं:/// ारहरषूक्षलरवाळीीळेपी.ळप ही लिंक बुधवारी ओपन होणार होती. मात्र, दिवसभर ओपन न झाल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील 66 हजार 10 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर आपला प्रवेश अर्ज भरून पसंतीक्रम द्यावयाचा आहे. मात्र, हे संकेतस्थळ सकाळपासूनच बंद असल्याने नोंदणी करता आली नाही.
एक तर ही प्रक्रिया पहिल्यांदा ऑनलाईन असल्याने आधीच पालक-विद्यार्थी संभ—मात आहेत. अनेकांनी सकाळीच नेट कॅफेवर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याचा प्रयत्न केला; मात्र लिंक ओपन होत नसल्याने त्यांना अर्ज भरता आला नाही. काही विद्यार्थी दुपारी 3 वाजेपर्यंत नेट कॅफेवर थांबून होते. मात्र, दिवसभर ही लिंक उघडलीच नाही. त्यामुळे वेळेसह पैशाचाही भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.
पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असली, तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंती क्रमांक नोंदवण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. प्रवेशाचे पोर्टल सुरू होण्याची वेळ ऑनलाईन दर्शवण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी पत्रकाद्वारे दिली.