नो पॅरलल टू ताराराणी इन वर्ल्ड हिस्ट्री..!

अमेरिकन इतिहासकार डॉ. रिचर्ड यांचे गौरवोद्गार; डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ग्रंथात उल्लेख
kolhapur News
नो पॅरलल टू ताराराणी इन वर्ल्ड हिस्ट्री
Published on
Updated on
सागर यादव

कोल्हापूर :

दिल्ली झाली दीनवाणी।

दिल्लीशाचे गेले पाणी।

ताराबाई रामराणी।

भद्रकाली कोपली॥

अशा शब्दात कवी देवदत्त यांनी मोगलमदिर्र्नी ताराराणींच्या शौर्याचा व पराक्रमाचा गौरव केला आहे. यावरून भद्रकाली राणीचे अंतिम ध्येय दिल्ली काबीज करणे हेच होते. म्हणून तर तिच्या फौजा दिल्लीच्या रोखाने धावत होत्या. दिल्लीत मराठ्यांचे सिंहासन निर्माण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. मराठा इतिहासातील या व अशा अप्रकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकून स्वराज्यरक्षक ताराराणी यांच्या स्फूर्तिदायी इतिहासाला उजाळा देण्याचे कार्य ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे.

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या दोन खंडांतील सुमारे 800 पानांच्या संशोधन ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली आहे. याच ग्रंथात ताराराणींच्या समकालीन शत्रूंच्या दरबारातील इतिहासकारांसह आजच्या पिढीतील परदेशी संशोधकांनी ताराराणी यांच्या अद्वितीय पराक्रमावर भरभरून लिहिले आहे. ‘नो पॅरलल टू ताराराणी इन वर्ल्ड हिस्ट्री...’ अशा शब्दांत परदेशी इतिहासकार प्रा. डॉ. रिचर्ड एम. ईटन यांनी रणरागिणी ताराराणी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या व अशा संदर्भांनी परिपूर्ण असा हा चरित्र ग्रंथ आहे.

महाराष्ट्राला ताराराणींचा विसर

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये भारत व महाराष्ट्राच्या इतिहासातील शूर, कर्तबगार स्त्रियांची नावे जाहिररित्या विचारल्यावर त्यांना झाशीची राणी, रझिया सुलताना, चांदबिबी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आदी नावे सांगण्यात आली. मात्र, महाराणी ताराराणी यांचे नाव कोणीच घेतले नाही. जगाच्या इतिहासात जिच्या पराक्रमाला, शूरत्वाला व कर्तबगारीला तोड नाही, अशा महान स्त्रीचे नावही तिच्या वारसदार असणार्‍या महाराष्ट्रातील मुलींना माहिती नसल्याने डॉ. पवार खिन्न झाले. यातूनच या ग्रंथाला गती मिळाली.

जगाच्या इतिहासात अद्वितीय : इतिहासकार प्रा. डॉ. रिचर्ड

रणरागिणी ताराराणी यांचा पराक्रम अद्वितीय असल्याचे मत जगभरातील अनेक इतिहासकारांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅरिझोनातील प्रा. डॉ. रिचर्ड एम. ईटन यांनी मध्ययुगातील दख्खन प्रदेशातील कर्तबगार स्त्री-पुरुषांची कामगिरी या विषयावर संशोधन केले. त्यांच्या यादीत विजापूरचा सुलतान इब—ाहिम आदिलशहा दुसरा, चांदबिबी सुलताना, मलिक अंबर, शहाजीराजे, जिजाबाई, ताराबाई आदींचा समावेश होता. ताराबाईंचा चरित्रकार म्हणून चर्चेसाठी ते सन 2001 मध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांना कोल्हापुरात भेटले. त्यावेळी डॉ. पवार यांनी डॉ. रिचर्ड यांना प्रश्न विचारला. ताराराणीसारखी एका लहानशा राज्याची तरुण विधवा राणी औरंगजेबासारख्या आशिया खंडातील सर्वात बलाढ्य अशा सत्ताधिशांशी सात वर्षे निकराने लढली. असा पराक्रम करणारी एखादी स्त्री जगाच्या इतिहासात अन्य कोणी झाली आहे काय? यावर डॉ. रिचर्ड यांनी उत्तर दिले, ‘नाही! अशी एकही स्त्री जगाच्या इतिहासात झालेली नाही!! तिला तोड नाही - नो पॅरलल इन द वर्ल्ड हिस्ट्री!’

विशेषतः एका स्त्रीने औरंगजेबासारख्या तत्कालीन सर्वात सामर्थ्यशाली सम—ाटाला आव्हान द्यावे आणि कौशल्याने त्याच्यावर मात करावी, अशा तोडीचा पराक्रम जगाच्या इतिहासात ताराबाईंपूर्वीही कधी घडलेला नाही व नंतरही कधी झालेला नाही.

ताराराणींच्या पराक्रमाच्या दडलेल्या पैलूंवर प्रकाश

मोगल दरबारातील खाफीखान व भीमसेन सक्सेना या समकालीन शत्रू दरबारातील इतिहासकारांकडूनही महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाचा मोठा गौरव केला आहे. बुद्धिमान, साहसी, प्रशासनकुशल आणि आपल्या सैन्यात लोकप्रिय असे वर्णन मुस्लिम इतिहासकारांनी केले आहे. ताराबाईचे इंग्रजी चरित्रकार डॉ. बि—ज किशोर ‘ताराबाई अ‍ॅण्ड हर टाईम्स’ या ग्रंथात, ताराबाईंना मराठ्यांच्या उत्तरेकडील राज्यविस्ताराची प्रणेती म्हणावयास हवे. राष्ट्राचा राजकीय द़ृष्टिकोन, लष्करी सामर्थ्य आणि नीतीधैर्य यामध्ये तिने आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले होते. शिवाजीने पेरलेले बीज राजाराम व ताराबाई यांनी जोपासले होते. ताराबाई आणि औरंगजेब यांच्यातील हा सप्तवार्षिक संघर्ष देशाच्या इतिहासातील एक अत्यंत तेजस्वी आणि गौरवशाली पर्व म्हणून सदैव लक्षात राहील, अशा शब्दात गौरव केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news