

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत विविध कारणे पुढे करून काही संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. राजकीय सोयीसाठी काही संस्थांना मतदानाचा अधिकार नाकारण्याचा प्रयत्न होत असून, कोणतीही संस्था अपात्र ठरू नये, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधताना आ. पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाबाबत आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९० दिवसांच्या आत गोकुळची निवडणूक होणे आवश्यक आहे. सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती मिळत असली, तरी न्यायालयाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. गोकुळ कर्मचारी संघटनेने पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, कर्मचारी संघटना स्वतंत्र अस्तित्वाची असून, त्यांनी त्यांच्या भूमिकेनुसार आंदोलन केले आहे.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महायुतीचे माजी चेअरमन पाठिंबा देण्याचे धाडस दाखवतील का, असा प्रश्न विचारला असता हा प्रश्न त्यांनाच विचारायला हवा, असे सांगत पाटील यांनी अधिक भाष्य टाळले.