Kolhapur Municipal Corporation | ‘दमडी’ही नाही हाती, विकासाला नाही गती

सहा महिने उलटले, तरी नगरसेवकांना निधी शून्य; शेकडो फायली धूळ खात
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation
Published on
Updated on

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात येऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही नगरसेवकांच्या पदरी निराशाच आहे. विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींना अद्याप एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. रस्ते, गटारी, पथदिवे, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने अशा मूलभूत सुविधांशी संबंधित शेकडो फायली धूळ खात पडल्या आहेत. 'निधीच नाही आणि फायलींना मंजुरी नाही, मग प्रभागात जाऊन तोंडाला पाने पुसायची का', असा संतप्त सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांतून विचारला जात आहे.

मोठे प्रभाग, अफाट समस्या आणि अपुरा निधी

महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार कोल्हापुरात पहिल्यांदाच चार जुने प्रभाग एकत्र करून एक मोठा प्रभाग तयार केला आहे. पूर्वीच्या ८१ प्रभागांचे रूपांतर अवघ्या २० प्रभागांमध्ये झालेे. या राजकीय जोडतोडीमुळे प्रत्येक प्रभागाचे भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि नागरी समस्यांचे स्वरूप प्रचंड वाढले आहे. एकाच प्रभागात उपनगरे, नवीन वसाहती, झोपडपट्ट्या आणि गजबजलेले व्यापारी परिसर एकत्र आले आहेत. रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा तुटवडा, ड्रेनेज लाईनचे उघडे पडलेले प्रश्न आणि कचऱ्याची समस्या यामुळे नागरिक नगरसेवकांना धारेवर धरत आहेत; मात्र एवढ्या अथांग पसरलेल्या प्रभागासाठी मिळणारा ८ ते १० लाखांचा प्रस्तावित निधी म्हणजे 'उंटाच्या मुखात जिरे' अशीच परिस्थिती आहे.

​प्रशासकीय ‘रेड टॅपिझम’मुळे विकास ठप्प

नगरसेवकांनी प्रभागातील तातडीच्या कामांचे प्रस्ताव, अंदाजपत्रके तयार करून प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत; परंतु महापालिका यंत्रणा हलण्यास तयार नाही. निधी मंजुरीची प्रक्रिया तर लांबच तांत्रिक मंजुरीच्या नावाखाली फायली एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरवण्यातच सहा महिने वाया जात आहेत. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरी समस्या गंभीर बनल्या असून नगरसेवक हैराण झाले आहेत.

​नगरसेवक हतबल

प्रभागातील नागरिक रोज तक्रारी घेऊन येत आहेत; पण निधीअभावी नगरसेवक पूर्णपणे हतबल झाले आहेत. सभागृह सुरू झाले म्हणून जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या; पण प्रशासन आम्हाला निधी न देता जनतेच्या दरबारात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहे, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे शहर विकासासाठी कोट्यवधीच्या प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे नागरिकांच्या रोजच्या गरजांसाठी काही लाखांचा निधीही उपलब्ध होत नाही. मोठ्या घोषणा आणि प्रकल्पांच्या गप्पांपेक्षा आधी प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवा, नगरसेवकांना निधी द्या आणि प्रलंबित फायली तातडीने मार्गी लावाव्यात.

प्रतिज्ञा उत्तुरे, गटनेत्या, शिवसेना ठाकरे गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news