

कोल्हापूर : राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी ‘गोकुळ’ निवडणुकीत २५ जागा तकदीने लढणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आपल्यापर्यंत कोणतीही चर्चा आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती आमदार सतेज पाटील यांनी पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच, ‘गोकुळ’चे मतदार समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत देतील, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
आ. पाटील म्हणाले, ‘गोकुळ’च्या दूध उत्पादक शेतकर्यांनी मागील पाच वर्षांतील माझा कारभार पाहिला आहे. ‘गोकुळ’मध्ये लोकशाही टिकली पाहिजे, दूध संघ शेतकर्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, या भूमिकेतूनच गेली दहा वर्ष संघामध्ये काम करत आहे. यंदाची ही तिसरी निवडणूक लढवत आहे. कोणाच्या हातामध्ये सत्ता राहिली, तर ‘गोकुळ’चं भल होईल हे ‘गोकुळ’च्या मतदारांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारच राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत देतील, असे आ. पाटील यांनी सांगितले.
मागील निवडणुकीत सोबत असणारे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे या निवडणुकीत सोबत नसणार आहेत, याचा फटका बसेल. त्यामुळे बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत का, असे विचारले असता आ. पाटील यांनी तसे काही नाही आहे. आमचे शेतकर्यांचे पॅनेल आहे. ‘गोकुळ’मध्ये साडेपाच लाख शेतकरीभिमुख कारभार असावा, यासाठी दहा वर्ष लढा दिला आहे. गेल्या पाच वर्षांतील कारभार शेतकर्यांनी पाहिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही शेतकरी पाठबळ देतील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
पुण्यात ‘गोकुळ’ निवडणुकीची चर्चा
पुण्यात ‘गोकुळ’चे दूध येत असल्याने पुण्यामध्येही ‘गोकुळ’ची चर्चा सुरू आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या प्रारूप मतदार यादीवर ४०० हरकती
‘गोकुळ’च्या प्रारूप मतदार यादीवर बुधवारअखेर सुमारे ४०० हरकती सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. बुधवारी दिवसभरात ७० हरकती दाखल झाल्या. उद्या शुक्रवारी (दि. २१) हरकती दाखल करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे. यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन त्या निकाली काढाव्या लागणार आहेत. यानंतर ४ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिधद्ध होणार आहे.
‘गोकुळ’च्या ४१० दूध संस्थांची आज सुनावणी
‘गोकुळ’ने चुकीच्या पद्धतीने नोंदणी केलेल्या ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी सहकार न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीमध्ये संस्थांनी याचिकाकर्त्यांना याचिका दाखल करण्याचा अधिकारी नाही, त्यांनी चुकीच्या पद्धतीने याचिका दाखल केली असल्याचे म्हणणे सादर केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी (दि. २०) सुनावणी ठेवली असून, याचिकेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.