

कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीतील सुरक्षेसंदर्भातील असंख्य त्रुटींमुळे ‘चित्रनगरीच्या गावी कुणीही यावे अन् टपली मारुनी जावे’ अशी ढिसाळ परिस्थिती आहे. सीसीटीव्ही यंत्रणा नाही, सुरक्षारक्षकाचा पत्ता नाही त्यामुळे आवारातील शूटिंगच्या साहित्यावर चोरीची टांगती तलवार आहे. सोमवार, दि. 20 चित्रनगरीतील वाड्याच्या लोकेशनचा नियमबाह्य वापर खासगी लग्नसोहळ्यासाठी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीत सुरू असलेल्या मनमानी कारभारावर सांस्कृतिक मंत्रालय कारवाईची वेसण कधी घालणार, असा सूर कलाकारांमधून उमटत आहे.
मोरेवाडी येथे 76 एकर परिसरात कोल्हापूर चित्रनगरी विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी 43 कोटी रुपयांचा निधी सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झाला असून शूटिंगसाठी लोकेशन्स तयार करण्यात आली आहेत. काही फ्लोअर बसवण्यात आले आहेत. सध्या चित्रनगरीत काही मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. शेड्यूलनुसार चित्रपट व जाहिरात चित्रीकरणही केले जाते. एकीकडे चित्रनगरीमुळे कोल्हापुरात चित्रपट व्यवसायाला चालना मिळाली असली, तरी चित्रनगरीतील प्रशासकीय कारभारात नियम डावलले जात आहेत. याबाबत सातत्याने कलाकार, निर्माते, सिनेव्यावसायिक राज्याच्या सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार तसेच सांस्कृतिक विभाग यांच्याशी संवाद साधतात. मात्र, केवळ पाहणी व चर्चा यापलीकडे चित्रनगरीतील असुविधा, असुरक्षा तसेच गैरसोयींवर ठोस तोडगा निघत नाही. त्यामुळे चित्रनगरीत सध्या अपूर्ण असलेल्या लोकेशन्समध्ये आवश्यक साहित्य कधी येणार, याकडे कलाकारांचे लक्ष लागले आहे.
नियमबाह्य लग्नसोहळ्याची चर्चा
सोमवारी सांस्कृतिक खात्यातील एका महिला अधिकार्याच्या नातलगांचा लग्नसोहळा चित्रनगरीतील वाड्यात साजरा करण्यात आला. यासाठी कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी दिवसभर चित्रनगरीत सुरू असलेल्या शूटिंगस्थळी तसेच शहरात या नियमबाह्य लग्नसोहळ्याचीच चर्चा सुरू होती.