

'चुकीला माफी नाही' असे व्हॉटस् अॅप स्टेटस मुश्रीफ समर्थकांच्या मोबाईलवर दिसत असल्याने कागल तालुक्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. 'समजदारोंको इशारा काफी हैं याचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. हा इशारा माजी खासदार संजय मंडलिक गटाला की शाहू आघाडीचे अध्यक्ष समरजित घाटगे गटाला आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या या नव्या स्टेटसमुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर 'यंदा चुकीला माफी नाही' हा स्टेटस दिसू लागला आहे. या स्टेटसवर हसन मुश्रीफ आणि गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांचे फोटोदेखील लावण्यात आले आहेत. कागल शहर आणि तालुक्यातील काही कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर हा स्टेटस दिसून येत आहे. ज्यांना माहिती नाही तेदेखील एकमेकांचे स्टेटस पाहून दिवसभर हे स्टेटस लावण्यात मग्न होते. मंत्री मुश्रीफ यांचे सोशल मीडियाचे काम पाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरदेखील हा इशारा लावलेला आहे.
आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्टेटसला महत्त्व निर्माण झाले आहे. यातून कार्यकर्ते वेगवेगळे अर्थ काढत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय घाटगे यांचा गट उघडपणे मुश्रीफांसोबत होता. माजी खासदार संजय मंडलिक यांचाही गट मुश्रीफ गटासोबत होता. समरजित घाटगे यांच्या गटाने एकाकी झुंज दिली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर आघाडी करणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.