Nipani theft news: निपाणीत स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी खांद्यावरून पळवली; CCTVत दृश्य कैद

या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Nipani theft news: निपाणीत स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी खांद्यावरून पळवली; CCTVत दृश्य कैद
Published on
Updated on

निपाणी : निपाणी शहर आणि उपनगरात घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच आता चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे. शहराबाहेरील आंदोलननगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. मंदिरातील ९ किलो वजनाची स्टीलची दानपेटी चोरट्यांनी चक्क जाजममध्ये गुंडाळून खांद्यावरून पळवून नेली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय?

आंदोलननगर येथे गेल्या तीन वर्षांपासून स्वामी समर्थांचे मंदिर असून तिथे नियमित धार्मिक विधी पार पडतात. शुक्रवारी रात्री १२:३० च्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या दक्षिण बाजूने जिन्यावरून आत प्रवेश केला. गाभाऱ्याबाहेर ग्रीलला कुलपाने बांधून ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी शिताफीने तोडली आणि लंपास केली. शनिवारी पहाटे ५ वाजता मंदिराचे पुजारी सुरेश संकपाळ पूजेसाठी आले असता, हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ मंदिर प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती दिली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसले?

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मंदिरातील सीसीटीव्ही तपासले असता, चार बुर्खाधारी चोरटे ही चोरी करताना स्पष्टपणे दिसून आले आहेत. चोरीची पद्धत पाहता चोरट्यांनी पूर्ण तयारीनिशी हा कट रचल्याचे दिसते.

महिन्याभराची रक्कम थोडक्यात बचावली

मंदिर कमिटीच्या वतीने दर पौर्णिमेला दानपेटीतील रक्कम मोजली जाते. दरमहा साधारण ५० हजार रुपयांपर्यंतची रोकड जमा होते. सुदैवाने, यावेळेस पेटीत मोठी रक्कम नव्हती. मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रवींद्र इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पेटीत सुमारे ५ हजार रुपयांची रोकड असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दुसऱ्यांदा चोरी, पोलिसांसमोर आव्हान

गेल्या तीन वर्षांत या मंदिरात चोरी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीच्या चोरीत चोरट्यांच्या हाती काही लागले नव्हते, मात्र यावेळी त्यांनी थेट दानपेटीच लंपास केली. देवाच्या चरणी अर्पण केलेली मायाही आता सुरक्षित नसल्याने, पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news