

कोल्हापूर : एल निनोच्या सावटामुळे यंदा पावसाचा लहरीपणा सुरू आहे. तरी सध्या जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्याचे चित्र दिलासादायक आहे. १७ प्रमुख धरणांमध्ये ९४.६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी नऊ धरणे १०० टक्के भरली आहेत. यामध्ये तुळशी, दुधगंगा (काळम्मावाडी), कडवी, चित्री, जंगमहट्टी, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला आणि कोदे या धरणांचा समावेश आहे. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे तूर्त पाणीटंचाईची चिंता कमी झाली आहे.
राधानगरी, वारणा, घटप्रभा धरणांत ९९ टक्के, कुंभी ९८ टक्के, कासारी, पाटगाव धरणांत ९७ टक्के, चिकोत्रा धरणात ८५ टक्के तर धामणी धरणात मात्र केवळ ३४ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १७ धरणांपैकी नऊ धरणे पूर्ण भरल्याने जलसाठ्याची एकूण स्थिती मजबूत झाली आहे. उर्वरित धरणांपैकी बहुतांश धरणांमध्येही ९७ ते ९९ टक्के साठा आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे.
राधानगरी धरण परिसरात आजअखेर २,७१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी जलविद्युत केंद्रातून कालवे आणि नदी असे एकूण १,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आयात वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.