

कोल्हापूर : रुग्णालयातच आता नवजात बालकांचे आधार कार्ड काढले जाणार आहे. या नवजात बालकांना आधारबेस जन्म दाखला दिला जाणार आहे. जिल्ह्यात त्याची सुरुवात येत्या सात ते आठ दिवसांत होणार आहे, तशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व मोठ्या सरकारी रुग्णालयांत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. टपाल विभागाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना सध्या निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड दिले जाते. यामध्ये केवळ बालकाचे छायाचित्र असते. पाच वर्षे पूर्ण झाली की, आधार कार्डमध्ये अपडेट केले जातात, त्यावेळी हाताच्या दहा बोटांचे ठसे, बुब्बुळाच्या स्कॅनचा बायोमेट्रिक द्यावा लागतो. यानंतर पुन्हा 15 व्या वर्षी तो द्यावा लागतो. मात्र, लहान बालकाचे आधार कार्ड काढण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावे लागते.
जन्मानंतर लगेचच बालकाचे आधार कार्ड काढणार्या पालकांची संख्या तुलनेने कमी आहे. यामुळे अनेकदा पाच वर्षे उलटून गेली तरी बालकाची आधार कार्ड नोंदणी केली नसल्याची उदाहरणे आहेत. विविध योजनांसह शाळा प्रवेशासाठी बालकांच्या आधार कार्डची गरज भासते, त्यावेळी मात्र पालकांची धावपळ उडते. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता रुग्णालयातच नवजात बालकांचे आधार कार्ड काढले जाणार आहे. ही जबाबदारी टपाल विभागाकडे देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मोठ्या सरकारी रुग्णालयांत टपाल विभागाचे पोस्टमन जाऊन नवजात बालकांचे आधार कार्ड काढणार आहेत. याकरिता पोस्टमनना टॅब देण्यात आले असून, त्यावर आधार नोंदणीची सुविधा दिली आहे. याकरिता संबंधित रुग्णालयाच्या यंत्रणेसही स्थानिक आशा वर्कर्सही टपाल विभागाला मदत करणार आहेत. रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर त्याची माहिती संबंधित पोस्टमनला देण्यात येणार असून, काही वेळातच तो येऊन बालकाचे आधार कार्ड नोंदणी करणार आहे.