कोल्हापूर : मल्लविद्येचे गुरुकुल असा नावलौकीक असणाऱ्या मोतीबाग तालमीत कुस्ती परंपरेतील नवी पिढी घडत आहे. कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून पारंपरिक कुस्तीचे एक प्रमुख केंद्र म्हणून जुना राजवाडा परिसरातील मोतीबाग तालीमच्या आखाड्याचा नावलौकीक आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात तालीम परंपरेचा भक्कम पाया रोवला. लोकाश्रयामुळे हा वारसा अधिक प्रगल्भ झाला आणि कोल्हापुरातील पेठापेठांत तालीम संस्था निर्माण झाल्या. मोतीबाग तालीम या परंपरेतील एक महत्त्वपूर्ण तालीम असून, आजही कुस्तीपटूंची नवी पिढी घडविण्याचे कार्य इथे सुरू आहे. संस्थापक अध्यक्ष कै. बाळ गायकवाड यांचा वारसा जपण्याचे कार्य तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहर अध्यक्ष दिनानाथसिंह, सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्या व्यवस्थापनाखाली वस्ताद उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने (वाकरे, ता. करवीर), महाराष्ट्र चॅम्पियन पै. यश माने आणि ‘साई’चे कोच अजितसिंह हे करत आहेत.
मोतीबाग तालमीत सन 2016 पासून वस्ताद अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित मल्ल घडविण्याचे काम सुरू आहे. पै. संग्राम पाटील व पै. पृथ्वीराज पाटील (देवठाणे), मानतेश पाटील व किरण पाटील (दिंडनेर्ली), विक्रम कुऱ्हाडे (नंदवाळ), प्रताप पाटील (कोतोली), कुमार पाटील, विजय शिंदे, सचिन महागावकर, सूरज पाटील असे अनेक नामवंत मल्ल त्यांनी घडविले आहेत.