

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या बांधकाम विभागातील कागदी घोटाळ्याचा नवा प्रकार उघड झाला आहे. स्विमिंग पूलच्या कामासाठी तयार केलेल्या एमबी (चशर्रीीीशाशपीं इेेज्ञ) चा वापर करून ड्रेनेज लाईनच्या कामाचे बोगस बिल उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुठेही टाईप केलेल्या एमबीवर बिल तयार होत नाही. पण महापालिकेतील भ—ष्ट साखळीच्या अजब कारभाराचा हा गजब नमुना समोर आला आहे.
महापालिकेतील घोटाळ्याची ही प्रकरणे उघडकीस आल्यानंतर काम करून बिलासाठी वेटिंगमध्ये असणार्या ठेकेदारांचा संताप अनावर झाला असून आम्ही प्रामाणिकपणे काम करूनही बिल मिळत नाही. मग ही बिले कशी मंजूर होतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामध्ये संबंधित काम प्रत्यक्षात झालेच नाही, तरीदेखील मोजणीसाठी अस्तित्वात असलेल्या दुसर्याच कामाच्या एमबीचा आधार घेऊन बिल तयार करण्यात आले. ही बाब म्हणजे ठेकेदार व अधिकार्यांमधील संगनमत, एमबी क्रमांकाची जुळवाजुळव आणि खात्रीशीर टक्केवारी व्यवहार यांची संगती स्पष्ट करणारी आहे. महापालिकेत काय होईल आणि काय नाही याचा काय नेम नाही.
एका बाजूला काम न करताच स्मार्ट स्कीम वापरून बिल उकळल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रामाणिकपणे काम करणार्या अनेक ठेकेदारांनी मात्र डोक्याला हात लावला आहे. काम मिळाल्यानंतर प्रामाणिकपणे कामाची पूर्तता केली. परंतु काही तांत्रिक त्रुटी, एमबीमधील दोष, स्वनिधी नाही, अशी अनेक कारणे सांगून त्यांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत. काही ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत. कामामध्ये पैसे गुंतवले, पण बिल मिळाले नसल्याने हे ठेकेदार अडचणीत आले आहेत. सुमारे दोन डझन ठेकेदार बिलाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.
प्रामाणिक ठेकेदारांवर संशय घेऊन त्यांची बिले पास केलेली नाहीत. अनेक ठेकेदारांनी बिल मिळण्याची आशाही सोडली आहे. झालेले कर्ज ते फेडत बसले आहेत. भ—ष्ट साखळीने पैसे घेऊनही अनेकांना बिलासाठी ठेंगा दाखविला आहे; तर दुसर्या बाजूला काम न करताच बिले उचलणारी टोळीच कार्यरत आहे. त्यामुळे झटक्यात पास झालेल्या बिलांची फेरचौकशी करण्याची गरज आहे.