

वारणानगर : कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील दळणवळण व पर्यटनास अधिक चालना मिळण्यासाठी नवीन घाट रस्ते निर्माण करून कोकण जोडल्यास कोल्हापूर जिल्ह्याच्या व कोकणच्या विकासाच्या प्रगतीत भर पडणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा व कोकण जोडून पर्यटनवाढीस अधिक चालना देण्यासाठी पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे भोवडे हा दोन जिल्हे जोडणारा नवीन घाट मार्ग रस्ता तयार करणे. अणुस्कुरा गावडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) जिल्हा हद्द ते रत्नागिरीत जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड धनगरवाडी हा दोन जिल्हे जोडणारा घाट रस्ता बांधकाम करणे. वाशी-पडसाळी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा हा दोन जिल्हे जोडणारा नवीन घाट रस्ता जोडण्यासाठी मिसिंग लांबीच्या रस्त्यासह तिन्ही नवीन घाट रस्त्यांचे बांधकाम करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी आमदार डॉ. विनय कोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली. लवकर सर्व कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.