

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, शेंडा पार्क आणि पुईखडीच्या टेकडीवरून दारकरी कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. याबाबतचा संशोधन प्रबंध ‘जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री’ या युनायटेड किंग्डममधून प्रकाशित होणार्या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामधून नुकताच प्रकाशित झाला. संशोधनात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील संशोधकांचा सहभाग आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक सत्पाल गंगलमाले यांच्या पीएचडी संशोधनाचा हा भाग असून प्रा. डॉ. सुनील गायकवाड हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे. कोळ्यांचा एक गट त्यांच्या बिळांना दरवाजा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘ट्रॅपडोअर स्पायडर’ या सामान्य इंग्रजी नावाने त्यांना ओळखले आते. बिळांना दार करण्याच्या त्यांच्या लकबीवरून त्यांना ‘दारकरी’ हे मराठी नाव देण्यात आले आहे. नव्याने शोधलेल्या प्रजातीमधील कोळ्यांच्या दातांची रचना आणि आठ डोळ्यांच्या मांडणीवरून त्यांचा समावेश ‘टाईटनइडिओप्स’ या कुळात करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरामधील त्यांच्या आढळक्षेत्रावरून त्यांना ‘टाईटनइडिओप्स कोल्हापूरईन्सिस’ असे नाव देण्यात आले आहे.
दारकरी कोळ्याची वैशिष्ट्ये
कोल्हापूरचा दारकरी कोळी गवताळ माळांच्या सपाट पृष्ठभागावर उभ्या किंवा उतारावरील जमिनीवर तिरकी बिळे करतो. बिळांच्या सुरुवातीला बनवलेले दरवाजे बाहेरच्या बाजूने भोवतालाशी तंतोतंत मिसळलेले असतात. त्यामुळे दरवाजा बंद असतो तेव्हा या कोळ्यांचे अस्तित्व कळून येत नाही. भोवतालात मिसळलेला दरवाजा हा त्यांच्या भक्ष्यांसाठी लावलेला सापळा असतो. भक्ष्य टप्प्यात आले की, हे कोळी क्षणार्धात त्यांना पकडतात आणि आत खेचून नेतात. तसेच हे दरवाजे कोळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून संरक्षण पुरवतात. आयुष्याचा बहुतेक काळ हे कोळी आपल्या बिळांमधे लपून किंवा दबा धरून बसलेले असतात. रातकिड्यांसारखे छोटे कीटक हे त्यांचे खाद्य आहे.