कोल्हापूरमधील देवरायांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध

देवरायांनी जपलेला जैवविविधतेचा ठेवा अधोरेखित
New species of snail discovered
कोल्हापूरमधील देवरायांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोधFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हातील उत्तर पश्चिम घाटात वसलेल्या तीन देवरायांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात महाराष्ट्रातील संशोधकांना यश आलेले आहे. देवराईमधील आढळक्षेत्रावरुन या प्रजातीचे नामकरण "डाईक्रॅक्स देवराईवासी" असे करण्यात आलेले आहे. या संशोधनामधे दहिवडी महाविद्यालय, दहिवडी येथील प्राध्यापक डॉ.अमृत भोसले; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर; आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील प्राध्यापक डॉ. ओमकार यादव यांचा समावेश आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या आंबा गावातील "आंबेश्वर देवराई", पाटगाव जवळील "श्री स्वयंभू मंदीर देवराई", आणि गगनबावड्याजवळील तळये गावातील "गंगोबा देवराई" येथून सदरची प्रजाती नोंदवण्यात आलेली आहे. नव्या प्रजातीचे वर्णन करणारा शोधनिबंध "जर्नल ऑफ कॉन्कोलॉजी" या ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड येथून प्रकाशीत होणार्‍या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून प्रसिद्ध झाला.

डाईक्रॅक्स कुळातील गोगलगाई त्यांच्या छोट्या आकारावरुन, शंखाच्या बाहेर आलेल्या श्वसननलिकेवरुन, आणि शंखावरील रेघांच्या रचनांवरुन वेगळ्या ठरतात. नव्याने शोधलेली गोगलगाई तिच्या शंखावरील रेघांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेवरुन कुळातील इतर गोगलगाईंपेक्षा वेगळी ठरते. या प्रजातीमधील गोगलगाई आकाराने ५ मीमी पेक्षा छोट्या आहेत. मान्सून पावसाचा कालावधी हा या गोगलगाईंचा सक्रिय असण्याचा काळ आहे. या गोगलगाई देवरायांमधील पालोपाचोळ्यांमधे आढळून आल्या. रात्रीच्या वेळी या गोगलगाई जमीनीवर पडलेल्या पानांवरती वावरताना आढळतात. दिवसाच्या वेळी त्या पाल्याखाली असणार्‍या मातीमधे विसावलेल्या आढळतात.

सह्याद्रीमधील अनेक गावे त्यांच्या देवरायांचे जतन करत आलेली आहेत. या देवरायांमधे मानवी हस्तक्षेप होऊ दिला जात नाही. त्यामुळे या जागांवरील समृद्ध जैवविविधता टिकून आहे. नव्याने शोध लागलेल्या गोगलगाईमुळे देवरायांनी जपलेली जैवविविधता अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news