

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासंदर्भात काही नवीन पर्याय समोर आले असून, यात शेतकर्यांचे कमीत कमी नुकसान कसे होईल, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. शेतकर्यांचे समाधान झाल्याशिवाय आणि त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग लादला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका मांडली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे; पण तो शेतकर्यांवर लादायचा नाही. शेतकर्यांचे समाधान होत असेल, तरच हा रस्ता केला जाईल. त्यामुळे शेतकर्यांशी चर्चा करून, त्यांचे हित जपूनच या प्रकल्पावर पुढे काम केले जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
बोलताना मुश्रीफ यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये महायुतीचा अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतानाच, निवडणूकही महायुती म्हणूनच लढवण्याचे ठरले होते. याबाबत काही जणांच्या मनात असलेल्या शंका आम्ही दूर करू. संचालक संख्या वाढवण्यामागील नेमके कारण आम्ही आमदार महादेवराव महाडिक यांना समजावून सांगू. तसेच, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भैया माने यांच्या नावाची शिफारस केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मनाने चांगले आणि स्पष्ट वक्ते आहेत. रोहित पवार यांना मात्र अजित पवार यांची जागा घेण्याची फार घाई झाली आहे. याच दबावामुळे त्यांनी जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला, असे मी वाचले आहे. आता त्यांनी त्यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी मतभेद करू नयेत, अशी अपेक्षा आहे.
‘हनी ट्रॅप’चे प्रकरण म्हणजे केवळ सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान आहे. त्यात तथ्य असते, तर विरोधकांनी सभागृहात पेन ड्राईव्ह नाचवून मोठा गदारोळ केला असता. लातूरमधील राड्याचे मी समर्थन करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात; पण थेट गुद्द्यांवर येणे चुकीचे आहे.