

प्रवीण मस्के
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक व ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कार्यामुळे मराठा इतिहास संशोधनाला नवे आयाम, नवी दिशा मिळाली. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दस्तऐवजीकरण अधिक समृद्ध झाले.
डॉ. पवार यांनी शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधन, ग्रंथप्रकाशन व दुर्मीळ साधनसामग्री जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे या केंद्राला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ या मालिकेतून 17 हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. डॉ. बाळकृष्ण लिखित ‘महान शिवाजी’ या ग्रंथाचे इंग्रजी व मराठी अनुवाद प्रकाशित करून त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा जागतिक स्तरावर प्रसार घडवला.
कोल्हापूरच्या सर्वांगीण इतिहासाचा पंचखंडात्मक प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून साकारला. ‘कोल्हापूर : ऐतिहासिक व प्राकृतिक’ हा पहिला खंड त्यांच्या संपादनातून प्रकाशित झाला आहे. याशिवाय त्यांनी स्वतःच्या 285 पुस्तकांचा संग्रह केंद्राच्या ग्रंथालयाला दान करून संशोधनाची अमूल्य परंपरा जपली आहे. याशिवाय, मोडी दस्तऐवजांचे वर्गीकरण, दुर्मीळ ग्रंथांचे संवर्धन व कोलंबिया विद्यापीठाच्या सहकार्याने ऐतिहासिक साधनांचे डिजिटायझेशन यासारखे उपक्रम राबवले.
डॉ. जयससिंगराव पवार यांच्या कार्यकाळात ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ या मालिकेंतर्गत महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन झाले. यात छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र (खंड 1, 2010), शाहू छत्रपतींचे संस्कृत चरित्र (खंड 2, 2010), डॉ. बाळकृष्ण : जीवन, कार्य आणि आठवणी (खंड 4, 2012), क्षात्र-जगद्गुरूंचे लेख आणि भाषणे (खंड 5, 2012), राजर्षी शाहू छत्रपतींचे राज्यकारभार (खंड 6, 2012), कोल्हापूर संस्थानचा सांख्यिकी अहवाल-मेजर डी. सी. ग्रॅहम संकलित, 1854 (खंड 7, 2017), महान शिवाजी- डॉ. बाळकृष्ण लिखित चार खंडांतील इंग्रजी आवृत्ती (खंड 8 ते 11, 2018), कोल्हापूर : ऐतिहासिक व प्राकृतिक- कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासाचा पहिला खंड, संपादन डॉ. पवार (खंड 17, जानेवारी 2025).
अमूल्य मार्गदर्शन
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली अनेक दुर्मीळ संदर्भ ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्यात आले. यात ताराबाईकालीन कागदपत्रे (3 खंड)-संपादन डॉ. अप्पासाहेब पवार (2012), जिजाबाईकालीन कागदपत्रे (1 खंड)- संपादन डॉ. अप्पासाहेब पवार (2012), शिवचरित्र -एक अभ्यास, सेतू माधवराव पगडी (2012, 2024), शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे, प्रेषित राजर्षी शाहू छत्रपती, श्री करवीर माहात्म्य यांचा समावेश आहे.