कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत गेली तीन वर्षे आयुक्त म्हणून कार्यरत राहिल्यानंतर सध्या पुणे महानगर प्रदेशाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झालेल्या के. मंजुलक्ष्मी तसेच जिल्हा परिषदेच्या नूतन सीईओ डॉ. जस्मिन यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची सोमवारी ‘पुढारी भवन’ येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर महापालिकेत काम करताना डॉ. जाधव यांनी नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका बजावली असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले. पुढील काळातही असेच मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर शहरातील विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीवेळी विविध स्तरांवर दबाव असतानाही ते काम अधिक दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आले. तसेच महापालिकेची सध्याची इमारत जुनी व अपुरी ठरत असल्याने शेंडापार्क येथे पाच एकर जागा मिळविण्यात आली असून, तेथे प्रशस्त नवी इमारत उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांमध्ये डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नूतन सीईओ डॉ. जस्मिन यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काम करण्यासाठी मोठा वाव आहे. आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली. यावेळी ‘पुढारी समूहा’चे सरव्यवस्थापक अनिल पाटील उपस्थित होते.