कोल्हापूर : सरकारी अथवा खासगी रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा झाला, रुग्णांना त्रास झाला, तर त्याची थेट जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार करा, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून दोषींवर कारवाई करेल, असेही ते म्हणाले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू वेळेत उपचार न झाल्याने झाला आहे. याप्रकरणी संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे आबिटकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. त्यांच्याकडे येणार्या तक्रारींवर दरमहा आढावा घेऊन चौकशी केली जाते. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाते, असेही त्यांनी सांगितले.