

सागर यादव
कोल्हापूर : राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमध्ये 4 हजार 860 क्रीडा शिक्षकांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे. वास्तविक प्राथमिक शिक्षण घेणार्या शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिक्षकांची नाही तर शारीरिक शिक्षकांची आवश्यकता आहे. खेळाडू घडवणार्या शारीरिक शिक्षण शिक्षकांची अवस्था सध्या दयनीय आहे. शासनाच्या धोरणानुसार 250 विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षकाची अत्यावश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात तब्बल 2 हजार संख्येमागे केवळ एक शारीरिक शिक्षक असल्याची सद्य:स्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शारिरिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
2024 च्या अहवालानुसार भारतातील केवळ 16.5 टक्के शाळांमध्ये स्वतंत्र शारीरिक शिक्षक उपलब्ध आहेत. सन 2012 पासून राज्य शासनाची शिक्षक भरती बंद आहे. दरम्यानच्या कालावधीत अनेक शाळांमधील अनेक शिक्षक निवृत्त झाल्याने त्यांची पदेही रिकामी आहेत. नवीन पद निर्मिती न झाल्याने गेल्या 50 वर्षांच्या कालावधीत सुमारे 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त असून यात 4 ते 5 हजार शारीरिक शिक्षकांचा समावेश आहे. 2014-15 पासून संचमान्यतेतून शारीरिक शिक्षण शिक्षकांचा दर्जा काढून घेऊन सर्वसामान्य पदवीधर शिक्षकाच्या पंक्तीत बसवले. 2017 मध्ये क्रीडा विषयाच्या तासिका निम्म्याने कमी करून शारीरिक शिक्षणावरच घाला घातला. आंदोलने, मोर्चे, उठाव केल्यानंतर शासनाने तासिका पूर्ववत केल्या. पुढे सेवा, शर्ती अधिनियम सुधारण्याच्या नावाखाली नव्याने शैक्षणिक अर्हता निश्चित केली. मात्र, यातून शारीरिक शिक्षणालाच आऊट करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी शारीरिक शिक्षणापासून वंचित
राज्यातील अनेक शाळांत शारीरिक शिक्षणाला शिक्षकच नाहीत. ज्याला खेळाची परिपूर्ण माहिती नाही, अशा शिक्षकांवर शारीरिक शिक्षण व क्रीडा स्पर्धाची जबाबदारी दिली जाते. यामुळे शारीरिक शिक्षणाला बगल दिली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. अनेक शाळांमध्ये खेळाचे मैदान, क्रीडा साहित्य आणि पिण्याचे पाणी यांसारख्या प्राथमिक सुविधांची कमतरता आहे.
मुलांना मैदानात आणणे महत्त्वपूर्ण जबाबदारी
अनेक शाळांमध्ये खेळाच्या मैदानांचा अभाव असल्याने शासनाच्या शिक्षण विभागातर्फे कमीत कमी जागेत विद्यार्थ्यांच्या शारिरिक सक्षमतेवर भर देणार्या शारिरिक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मोबाईल विश्वात गुरफटलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढून मैदानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पालक, शिक्षकासह समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.