Drinking Water Crisis | टंचाईग्रस्त दोन हजार गावांत टँकर सुरू

मराठवाडा, पुणे, नाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई
Drinking Water Crisis |
Drinking Water Crisis | टंचाईग्रस्त दोन हजार गावांत टँकर सुरू
Published on: 
Updated on: 

सुनील कदम

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात राज्यातील जवळपास दोन हजार गावांत पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. विशेषतः मराठवाडा, पुणे आणि नाशिक विभागात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवणार असून, आगामी काळात राज्यभरात तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत.

यंदा राज्यभरात कुठेही सरासरी इतका किंवा समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाची सरासरी २७ टक्के तूट आहे. मराठवाडा विभागात यंदा पावसाची सर्वाधिक म्हणजे तब्बल ३६ टक्के तूट आहे. त्या खालोखाल विदर्भात २४ टक्के, कोकणात १० टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ४ टक्के तूट आहे. राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये आणि २९८ तालुक्यांमध्ये पावसाची तूट आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पिकांची अवस्था चिंताजनक आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील पिके करपून गेली आहेत. तशातच जलसंपदा विभागाने काही भागात उपसाबंदी लागू केली आहे. त्यामुळे पिकांची अवस्था आणखी दयनीय झालेली आहे.

धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा!

राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा ३,०३२ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १,७१५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यंदा राज्याच्या सर्वच भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश धरणे पूर्णक्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे धरणांमध्ये ३४४ टीएमसी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ‘कोयना’ आणि ‘उजनी’ ही दोन मोठी धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत, तर ‘जायकवडी’ धरणातही यंदा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

हजारो गावांत टँकर लागणार

पावसाळा संपत आला असला तरी अजून परतीच्या पावसाची थोडीफार आस आहे. मात्र, आताच राज्यातील दोन हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अद्याप अमरावती आणि नागपूर विभागात टँकर सुरू झालेले नाहीत. मात्र, एकूणच पावसाची तूट, धरणांमधील अपुरा पाणीसाठा आणि पावसाने मारलेली दडी विचारात घेता आगामी कालावधीत राज्यातील हजारो गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

भूजल पातळीही खालावली!

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील भूजल पातळी सरासरी दोन मीटरने खालावली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये तर भूजल पातळी चिंताजनक पातळी इतकी खालावलेली दिसत आहे. तरीदेखील पाणीटंचाईमुळे राज्यभरातील बहुतांश भागात पाण्यासाठी कूपनलिकांची खोदाई मोठ्या प्रमाणात सुरू असलेली दिसत आहे. प्रामुख्याने शेतीसाठी पाणी मिळविण्यासाठी कूपनलिकांची खोदाई जोमात असलेली दिसत आहे. एकूणच राज्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले असून, आगामी काळात हे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news