

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केला. आकडेवारीवरून कुणीही गैरसमज पसरविण्याची गरज नाही. दुबार व कोरे ठराव कुणालाही देऊ नका, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
श्री. पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार, २५ जून रोजी शक्तिप्रदर्शनाने १,९७२ ठराव दाखल करण्यासाठी जाहीर केले होते. तालुकावार किती ठराव दाखल करणार याची आकडेवारी जाहीर केली होती. आम्ही शक्तिप्रदर्शनाने तिथे गेल्यानंतर सहायक निबंधक-दुग्ध कार्यालयासमोर फक्त ३०० ते ४०० लोकांची उभारण्याची व्यवस्था होती. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्राधिकृत अधिकारी सहायक निबंधक-दुग्ध कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही किमान २००० लोक येणार आहोत. अपुऱ्या व्यवस्थेत हे इतके लोक मावणार नाहीत, थांबणार नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही पुरेशी व्यवस्था करा, असे सांगितले होते.
शक्तिप्रदर्शनाने गेल्यानंतर प्रचंड गर्दी उडाली. ठाकरेंना जाब विचारल्यानंतर, मी प्रशासकांना अशी सूचना केली होती. परंतु, त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगितले. त्यावेळी आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘प्रशासक कुठे आहेत?’ अशी विचारणा केली. त्यावर प्रशासक रजेवर असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासक मंडळातील सदस्य प्रदीप मालगावे यांना दूरध्वनीवरून ‘तुम्ही मुद्दाम अशी अवस्था केली. कायदा सुव्यवस्था अडचणीत यावी आणि आमचे ठराव नोंद होऊच नयेत म्हणून हे कारस्थान तुम्ही केले’, असा आरोप त्यांनी केला होता. स्वतः मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, अरुणराव डोंगळे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, युवराज पाटील, किसनराव चौगुले, रणवीरसिंह गायकवाड, नवीद मुश्रीफ, छोटूराव इंगवले, सुधीर देसाई, सतीश पाटील-गिजवणेकर आदी नेतेमंडळी तीन-चार तास तिथे थांबले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नेत्यांनी कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी करणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगून संध्याकाळी सात वाजेपर्यंत नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना घरी जाऊन गायी-म्हशींच्या धारा काढायच्या होत्या. महिला, म्हातारी माणसे यांचे ठराव त्यादिवशी घेऊ शकले नाहीत. त्यांना दि. २९ रोजी दाखल करू, असे सांगितले. अनेकानी गट्टे घेतले, त्याचा हिशेब त्यांना करता आला नाही.
‘ते’ ठरावधारकही सहकार्य करतील
आम्ही आदल्या दिवशी ६१८ ठराव परस्पर सहायक निबंधक-दुग्ध कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यातील बहुतांशी गेल्या पाच वर्षांतील आमचा कारभार पाहता मतदानामध्ये आम्हाला सहकार्य करतील, असा विश्वास आहे. प्रशासनाने दि. २४ अखेर १,६५३ ठराव दाखल झाल्याची आकडेवारी जाहीर केली होती. दरम्यान, ही चुकलेली आकडेवारी दुरुस्त करून प्रशासनाने ती शुक्रवारी १,७४३ जाहीर केली. आकडेवारीत झालेला फरक प्रशासनानेच मान्य केला आहे. अद्यापही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही दाखल केलेल्या ठरावांच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. आम्ही सोमवारी याची खातरजमा करणार आहोत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते ठराव दाखल करणार आहोत. आम्ही दोन किंवा तीन जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन जमा झालेली प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर करणार आहोत.
दुबार व कोरे ठराव कुणालाही देऊ नका
पक्की मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याच आठवड्यामध्ये जिल्हास्तरीय मेळावा घेऊन प्रत्येक ठरावधारकाची फोटोग्राफी केली जाईल. त्यामुळे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेतेमंडळी आणि ठरावधारकांना विनंती आहे. अनेक पक्षांचे लोक आपली ठराव संख्या वाढवण्यासाठी कोरे ठराव द्यावेत किंवा दुबार ठराव द्यावेत, अशी मागणी करत आहेत. या आमिषाला बळी पडू नये. असे झाल्यास ठराव बाद होण्याची शक्यता आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.