

कोल्हापूर : मांगल्य, भक्ती आणि उत्साहाचा जागर करणारा शारदीय नवरात्रौत्सव आता अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या मंगल क्षणासाठी घरोघरीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बहुतांश घरांतील स्वच्छता पूर्ण झाली असून, देव्हारा सजविण्याबरोबरच नवरात्रौत्सवासाठी घराची आकर्षक सजावट करण्याची तयारी सुरू आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्याने बाजारपेठही बहरली आहे.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने घरातील देव्हारा स्वच्छ करून सजविण्यात येत आहे. पूजेची भांडी घासून-पुसून ठेवली जात असून, अखंड ज्योतीसाठी लागणाऱ्या वाती तयार करण्याचे कामही सुरू आहे. काही घरांमध्ये फुलांची आरास, तोरणे, रांगोळी तसेच विविध सजावटीच्या वस्तूंच्या माध्यमातून नवरात्रौत्सवासाठी घर सजविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
नऊ दिवसांच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करून खरेदी केली जात आहे. विशेषतः घटस्थापनेसाठी लागणारे मातीचे घट, बियाणे, माती वेताच्या दुरड्या, पत्रावळ्या आणि अन्य पूजासाहित्य बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे शहरातील पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी महिलांची वर्दळ वाढू लागली आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक विधी केले जातात. नवरात्रीतील नैवेद्य, प्रसाद तसेच उपवासाच्या पदार्थांसाठी लागणाऱ्या वस्तूंचीही खरेदी सुरू झाली आहे.
दरम्यान, नवरात्रौत्सवासाठी लागणाऱ्या पारंपरिक साहित्याला यंदाही मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. घटस्थापनेचा दिवस जवळ येत असल्याने पुढील दोन-तीन दिवसांत पूजा साहित्याच्या खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
घटस्थापनेपूर्वी घराघरांत तयारी
देव्हारा स्वच्छता : देवघराची स्वच्छता करून पूजेची जागा सजविण्यावर भर
पूजा साहित्य : मातीचे घट, सुगड, माती, वेताच्या दुरड्या, पत्रावळ्या आदींची खरेदी
अखंड ज्योत : नऊ दिवसांच्या अखंड ज्योतीसाठी वाती आणि आवश्यक साहित्याची तयारी
सजावट : फुलांची आरास, तोरणे, रांगोळी आणि आकर्षक सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात
नैवेद्याची पूर्वतयारी : नऊ दिवसांच्या नैवेद्य व प्रसादासाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी आणि तयारी