कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी श्रीगणेशा केला. मंगळवारी पहिला उमेदवारी अर्ज मुश्रीफ यांचा दाखल झाला. त्यांच्यापाठोपाठ माजी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर आणि वसंत ऊर्फ बाळासो खाडे यांनीही अर्ज दाखल केले. दिवसभरात ४७० अर्जांची विक्री झाली. रमणमळा येथील निवडणूक कार्यालयात मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वप्रथम सर्वसाधारण गटातून गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यापाठोपाठ याच गटातून माजी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी एक आणि वसंत ऊर्फ बाळासो खाडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानुसार दिवसभरात तीन उमेदवारांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले.
गर्दी झाल्यास उमेदवारासोबत एकच व्यक्ती
पहिल्या दिवशी निवडणूक कार्यालयात उमेदवारासोबत दोन व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. मात्र आता गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने उमेदवारासोबत एकाच व्यक्तीला कार्यालयात प्रवेश देण्याचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.
तीन दिवस असणार सुट्टी
शुक्रवारी (दि. १८) जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. शनिवार व रविवारीही सुट्टी असल्याने निवडणूक कार्यालय बंद राहील. या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नसल्याने गुरुवारसह अखेरचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यास गर्दी होणार आहे.
गर्दी, गोंधळ टाळा
गुरुवार, सोमवार व मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी पाहता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाहतूक मार्ग, उमेदवार, कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी जागा, पार्किंग याचे नियोजन केले आहे. गर्दी, गोंधळ टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.