

रवींद्र देसाई
कडगाव : भुदरगड तालुक्यातील नितवडे, खेडगे, एरंडपे, दोनवडे गावांच्या वनहद्दीत असणार्या नैसर्गिक सात धबधब्यांची सुधारणा झाल्यानंतर हे धबधबे मनमोहक झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. नुकतेच मोठ्या थाटामाटात या धबधब्यांचे लोकार्पण झाले आहे. त्यानंतर हे धबधबे पाहण्यासाठी आता प्रचंड रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत आहे.
भुदरगड तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक धबधबे आहेत. पण या धबधब्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. मात्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून तसेच पर्यटन विकास महामंडळ व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले आहे. यासाठी सुमारे सात कोटींचा आराखडा असून, 3 कोटी 44 लाख खर्चून विकासकामे केली आहेत. हे नैसर्गिक धबधबे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असे आकर्षक बनविले गेले आहेत. शिवाय एकाच ठिकाणी सात धबधब्यांची रांग असल्यामुळे येथील पर्यटकांसाठी दिलेली ही जणू सप्तरंगांची उधळणच आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्याने नितवडे, दोनवडे, खेडगेतील धबधबे सुरक्षित वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावाजले जाणार आहेत.
वन विभाग आणि पर्यटन महामंडळाने एकत्रितपणे सुरक्षेच्यादृष्टीने चिर्यांच्या पायर्या, लोखंडी पूल, दिशा दर्शक फलक, ड्रेसिंग व चेंजिंग रूम्स, स्वच्छतागृह, सुरक्षा ग्रील्स यांची सुसज्ज व्यवस्था केली आहे. काही धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदीचे फलकही लावले आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. मात्र पर्यटकांनी वयोवृद्ध, माहिला व लहान मुले यांचा विचार करून हुल्लडबाजी व गैरप्रकार टाळून आनंद घेतला पाहिजे.
खेडगे, नितवडे, दोनवडे येथील महाकाय, भीमकाय, डुक्करकडा, जांभूळकडा, मंडीपकडा आणि सवतकडा अशा सात धबधब्यांचा समावेश असून तेे गारगोटीपासून अवघ्या 18 किलोमीटर परिसरात आहेत. धबधब्यामुळे पर्यटकांना डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव मिळतो.