

सुभाष पाटील
विशाळगड : निसर्गाचा कोप असो वा तांत्रिक बिघाडाचे आव्हान, जेव्हा संपूर्ण जग अंधारात बुडते, तेव्हा जिवाच्या आकांताने धावणारा एकच 'योद्धा' दिसतो. तो म्हणजे महावितरणचा 'लाईनमन'! ज्यांच्या अहोरात्र कष्टावर आज जगाचा विकास आणि प्रत्येक घराचा प्रकाश अवलंबून आहे, अशा त्या 'प्रकाशदूतांचा' सन्मान करण्याचा आजचा गौरवशाली दिवस – 'राष्ट्रीय लाईनमन दिन'.
मृत्यूच्या दाढेतून उजेडाचा मार्ग
शाहूवाडीचा दुर्गम भाग, सह्याद्रीच्या रांगा आणि पावसाळ्यातील निसरडी वाट अशा कठीण परिस्थितीतही येथील लाईनमननी कधीही आपली सेवा खंडित होऊ दिली नाही. रक्ताचे पाणी करून आणि घरादाराची ओढ बाजूला सारून जनतेच्या सेवेसाठी धावून जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतील चमक आज काही वेगळीच होती. "आमच्या कामाची दखल समाजाने घेतली, यातच आमचे समाधान आहे," अशी भावना एका ज्येष्ठ लाईनमनने व्यक्त केली.
संकटाच्या छातीवर पाय ठेवून उभे राहणारे शौर्य
'नाते प्रकाशाचे आणि ध्येय ग्राहकसेवेचे' हे ब्रीदवाक्य केवळ कागदावर नाही, तर रक्तामांसात भिनावे लागते. मग तो १९९३ चा किल्लारीचा थरकाप उडवणारा भूकंप असो, २०२० च्या 'निसर्ग' आणि 'तौक्ते' चक्रीवादळांनी उडवलेली दाणादाण असो, किंवा मानवी अस्तित्वाला आव्हान देणारा महाभयंकर 'कोविड' काळ. जेव्हा सामान्य माणूस सुरक्षिततेसाठी घराचे उंबरठे ओलांडायला घाबरत होता, तेव्हा महावितरणचे हे 'जनमित्र' आणि 'अभियंते' ढाल बनून उभे होते. भरलेल्या नदीच्या पात्रातून पोहत जाऊन, खांद्यावर विजेचे खांब वाहून नेण्याचे अचाट धैर्य आणि शून्यातून पुन्हा वीजयंत्रणा उभी करण्याची जिद्द केवळ या जिगरबाज योद्ध्यांकडेच आहे.
सुरक्षा: तीन पिढ्यांच्या भविष्याची कवचकुंडले
हे कर्तव्य बजावत असताना 'सुरक्षा' हा केवळ शब्द नाही, तर तो एका आयुष्याचा आधार आहे. कर्तव्याच्या ओघात होणारी एका सेकंदाची चूक केवळ आर्थिक हानी करत नाही, तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडील, जोडीदार आणि मुलांच्या डोळ्यांत कायमचा अंधार दाटू शकते. म्हणूनच, 'सुरक्षा साधनांचा वापर' ही तुमची खरी शक्ती आहे. २०२५ मधील सुरक्षा मोहिमेत ५ जागतिक विक्रमांवर नाव कोरणारे महावितरण, आज ग्राहकसेवेचा कणा असलेल्या या लाईनमन आणि लाईनवूमनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
"आमचा लाईनमन हा महावितरणचा केवळ कर्मचारी नसून, तो या संपूर्ण यंत्रणेचा कणा आहे. भर पावसात, मध्यरात्री किंवा जीवावर बेतणाऱ्या परिस्थितीतही ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे यासाठी तो झटत असतो. या प्रकाशदूतांच्या कौशल्याचा आम्हाला अभिमान आहेच, पण माझी एकच विनंती आहे— 'सुरक्षा साधनांशी तडजोड करू नका.' तुमचे प्राण तुमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या विभागासाठी अमूल्य आहेत. सर्व जनमित्रांना लाइनमन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
— प्रविण कुंभारे (उपकार्यकारी अभियंता, महावितरण, उपविभाग शाहुवाडी)