Environmental policy setback | राष्ट्रीय हरित महामार्ग धोरणालाच ‌‘हरताळ‌’!

सात लाख झाडे तोडली, लावली किती त्याचा थांग ना पत्ता
Environmental policy setback |
Environmental policy setback | राष्ट्रीय हरित महामार्ग धोरणालाच ‌‘हरताळ‌’!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात राष्ट्रीय महामार्गांची उभारणी होत असताना जवळपास 7 लाख झाडांची कत्तल करण्यात आली. शिवाय त्यानंतर हरित महामार्ग धोणालाच हरताळ फासण्यात आला. त्यामुळे आज राज्यातील महामार्गांवरील प्रवास अक्षरश: ‌‘धगधगता‌’ झाला आहे.

केंद्र शासनाने 2015 साली हरित महामार्ग धोरण तयार केलेले आहे. कोणताही राष्ट्रीय महामार्ग बनवत असताना प्रदुषण कमी करणे, महामार्गावर सावली निर्माण करणे, जमिनीची धूप थांबविणे आणि महामार्गांच्या दुतर्फा हरित पट्टी तयार करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलेले आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासाठी या धोरणानुसार अनेक मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आलेली आहेत.

धोरणच बासनात!

मात्र राज्यातील महामार्गांची कामे करीत असताना या धोरणालाच हरताळ फासलेला दिसत आहे. राज्यात 18 हजार 459 किलोमिटर लांबीचे 16 राष्ट्रीय महामार्ग आहेत. हरित महामार्ग धोरणानुसार या महामार्गांच्या दुतर्फा 1 कोटी 53 लाख 94 हजार 806 झाडे असायला पाहिजे होती. पण आज राज्यातील महामार्गांवर झाडे नजरेला पडणेसुध्दा दुर्मिळ झाली आहेत, कारण पूर्वी होती त्या झाडांचा पुरता नायनाट करण्यात आलेला आहे. शिवाय मार्गदर्शक तत्वानुसार नवीन झाडेही लावलेली नाहीत.त्यामुळे आज राज्यातील कोणत्याही महामार्गावरून प्रवास करताना जणूकाही एखाद्या कोळशाच्या भट्टीतून प्रवास करतो आहोत की काय, असे वाटत आहे.

अशी चालते कंत्राटदरांची हातचलाखी...

महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपन करण्याबाबत कंत्राटदारांची कशी हातचलाखी चालते याचे पुणे-नाशिक महामार्ग हे उत्तम उदाहरण आहे. या महामार्गाच्या कामासाठी 23 हजार झाडे तोडण्यात आली होती. कंत्राटदाराने त्या बदल्यात 77 हजार झाडे लावल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात झाडे मोजली तर ती निघाली अवघी 316 झाडे. न्यायालयाने याबाबत कंत्राटदाराला जाब विचारला असता त्याने रस्ता दुभाजकावर लावलेली शोभेची झुडपे ही झाडे म्हणून दाखविल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील झाडून सगळ्या महामार्गांच्या कंत्राटदारांनी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या धोरणाला हरताळ फासताना अशीच मखलाशी केल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय हरित महामार्ग धोरणातील तरतुदी अशा

राष्ट्रीय महामार्गांची उभारणी करीत असताना महामार्गाच्या दुतर्फा दोन-दोन रांगांमध्ये सजावटीच्या झाडांची लागवड करणे.

तिसऱ्या रांगेमध्ये सावली देणाऱ्या मोठ्या झाडांची लागवड करणे.

सजावटी झाडांमध्ये गुलमोहर, अमलतास, कांचन, जॅकरंडा, अर्जून, जांभूळ, सिल्व्हर ओक, शिरीस आणि सिसम झाडांचा समावेश.

सावलीच्या झाडांमध्ये पिंपळ, पाकर, महुआ, आंबा, कडूलिंब, चिंच, शिसम या मोठ्या झाडांचा समावेश करणे बंधनकारक.

प्रतिकिलोमिटर सजावटीची 666 आणि सावलीची 168 अशी 834 झाडे लावून ती जगविणे महामार्ग कंत्राटदारांवर बंधनकारक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news