

National Archery Championship
सुभाष पाटील
विशाळगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे संपन्न झालेल्या १५ व्या व १६ व्या राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेत शाहूवाडी तालुक्यातील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूल, उकोलीची विद्यार्थिनी कुमारी धनुषा संदीप जाधव हिने आपल्या अचूक निशाण्याने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. धनुषाने या स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
दोन सुवर्णपदकांवर मोहोर -
२२ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत धनुषाने १० वर्षांखालील 'रिकर्व्ह' धनुष्य प्रकारात सहभाग घेतला होता. तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर वैयक्तिक गटात व सांघिक गटात अशी दोन सुवर्णपदके जिंकून शाळेचे, जिल्ह्याचे आणि पर्यायाने संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले.
यशाचे मानकरी -
धनुषाला अभिजीत पाटील आणि प्रशिक्षक किरण खोत (आर्चरी प्रशिक्षक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. धनुषाच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ग्रामीण भागातील एका कन्येने राष्ट्रीय स्तरावर मारलेली ही मजल सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. धनुषावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"धनुषाची जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव यामुळेच तिला हे यश मिळाले आहे. भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करेल असा आम्हाला विश्वास आहे."
- गोरख कदम, शाळा अध्यक्ष