

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या ‘नमामि पंचगंगा’ कृती आराखड्याला बुधवारी राज्य सरकारने मंजुरी दिली. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था आराखड्याची अंमलबजावणी करणार आहेत. कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत.
कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (भूमिगत) नद्यांच्या प्रवाहापासून एकत्र मिळून प्रयाग चिखली येथून पंचगंगा नदी वाहते. कोल्हापूर ते शिरोळ असा 67 कि.मी.चा हा नदीचा पट्टा आहे. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका तसेच कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी व हातकणंगले या चार नगरपरिषदा व नगरपंचायती, 174 छोटी मोठी गावे नदीकाठावर वसलेली आहेत. या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले असून पंचगंगेचे प्रदूषणही त्या प्रमाणात वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2024 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश आहे. प्रदूषणाच्या पातळीनुसार पाच निकषापैकी पहिले तीन अतिगंभीर मानले जातात. त्या निकषात पंचगंगा तिसर्या स्थानावर आहे.