

मुदाळतिट्टा: "जोतिर्लिंगाच्या नावानं चांगभलं!" च्या जयघोषात आणि नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण करत, श्रीक्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील नागपंचमी यात्रा यंदा लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली, तर उत्कृष्ट नियोजन आणि सेवाभावामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण होते.
यात्रेची सुरुवात पहाटे पाच वाजता राज्याचे आरोग्य व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेनंतर झाली. त्यानंतर महाआरती पार पडली आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सहवाद्य मिरवणुकीत कुंभार समाजातील नागमूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली आणि विधीवत पूजा करण्यात आली.
पावसाची उघडीप असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यात्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. महिलांनी लाह्यांचा नैवेद्य वाहून नागदेवतेची गाणी गायली. यात्रेच्या निमित्ताने खाऊ, खेळणी, नारळ, प्रसाद यांची जोरदार विक्री झाली, त्यामुळे व्यापारी वर्गही समाधानी दिसला.
यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाघापूर, आदमापूर, मुदाळतिट्टा, कुर येथे एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. गारगोटी, राधानगरी आदी आगारांमधून विशेष बसगाड्याही सोडण्यात आल्या. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि जोतिर्लिंग सहज सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या अन्नछत्रांमधून भाविकांना भोजन देण्यात आले.
पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती आणि सर्व भाविक समाधानी असल्याचे चित्र दिसून आले. "जोतिबाच्या नावाने चांगभलं चांगभलं" च्या गजरात यात्रेला भक्तिभावाची रंगत आली.