कोल्हापूर : मिश्र शैलीतील स्थापत्याचे प्रतीक ‘नगारखाना’

कोल्हापूरच्या जुना राजवाड्याचे वैशिष्ट्य : छत्रपतींच्या राजवटीचा साक्षीदार
engineers day 2024
कोल्हापूर : जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगारखान्याची तीन मजली दिमाखदार इमारत.Pudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सागर यादव

मराठा, द्रविडी, मुरीश, रोमन, राजस्थानी, इंडो सारसेनिक व निओ मुघल अशा मिश्र स्थापत्य शैलीची रचना असणार्‍या कोल्हापुरातील जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगारखाना कोल्हापूरचे सांस्कृतिक- ऐतिहासिक वैभव म्हणणे वावगे ठरणार नाही. इसवी सन 1828 ते 1838 या कालावधीत बांधलेली ही वास्तू आज 186 वर्षांनंतरही करवीरकर छत्रपतींच्या राजवटीचा इतिहास सांगत दिमाखात उभी आहे.

जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील उंच जागेवर असणार्‍या जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ‘नगाराखाना’ या तीन मजली भव्य वास्तूची निर्मिती करण्यात आली. आद्य क्रांतिकारक छत्रपती चिमासाहेब महाराज यांचे थोरले बंधू छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराजांच्या कारकिर्दीत ‘नगारखाना’ ही महत्त्वाची वास्तू उभारण्यात आली. त्यांनी इसवी सन 1828 ते 1838 या सुमारे 10 वर्षांच्या कालावधीत ही देखणी इमारत निर्माण केली.

पंचगंगेतून नावेतून दगडाची वाहतूक

दोनशे वर्षांपूर्वी वाहतूक यंत्रणा विकसित न झाल्याने दगड वाहण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. जोतिबा परिसरातील दगडी खाणींमधून आणण्यात आलेला दगड कोल्हापूरच्या वेशीवर वाहणार्‍या पंचगंगा नदीला पूल नसल्याने नदी पात्रातून नावेतून शहरात आणण्यात आल्याचे उल्लेख आहेत. ऑक्टोबर 1834 मध्ये नगारखान्याच्या दिमाखदार इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी सुमारे 5 लाख रुपयांचा खर्च आल्याच्या नोंदी करवीर छत्रपतींच्या ऐतिहासिक कागदपत्रांत आहेत.

विविध शैलीतील स्थापत्यांचा मिलाप

इंग्रज राजवटीपूर्वी बांधण्यात आलेल्या नगरखान्यात मराठा, द्रविडी, मुरीश, रोमन, राजस्थानी या मिश्र शैलीतील स्थापत्याचा समावेश आहे. नगारखान्याची तळरचना नक्षीदार मंदिररासारखी आहे. पायथ्याला हिंदू शैलीतील पानकणसाच्या जागी एरंड, धोत्र्याचे फुल आहे. तळात दगडात कोरलेले फुलांच्या आकारातील कलमदान झरोके आहेत. जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यातून प्रेरणा घेऊन नगारखान्याच्या आग्नेय-नैऋत्य कोपर्‍यातील शिल्पपटावर ‘शिवपार्वती कल्याणसुंदरम’ विवाहाची कथा कोरलेली आहे. त्यांच्या दोन्ही बाजूंना बासरी, मृदंग, ढोल, वीणा वाद्ये वाजवित नृत्य करणारे आकर्षक देहयष्टीचे कलाकार आहेत. त्यावरील शिल्पपटात एकमेकांचे पिसारे आपल्या चोचीत धरणार्‍या मोरांची रांग आहे. नगारखान्याच्या उत्तर प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती तर दक्षिण बाजूस क्षेत्रपाल रंकभैरवाची मूर्ती कोरलेली आहे. त्यावर दोन्ही बाजूला दिसणारी व्याल शिल्पे आहेत.

उत्तर दिशेला गणेश मूर्तीवर मोठे घड्याळ लावले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 10 फूट उंचीवर नृत्य मुद्रेत असलेल्या देवी-देवता उभ्या रांगेत कोरल्या आहेत. शिल्प, चित्र, नृत्य या कला माध्यमातून भारतीय कलासंस्कृती या शिल्पांत एकवटली आहे. मूळ दिंडी दरवाजा मेवाड वास्तुकलेचा नमुना आहे. त्यावर बहूपर्णी मुरीश शैलीची आभासी कमान आहे. दरवाजा लावण्यासाठी दोन्ही प्रवेशद्वारालगत भिंतीला 9 इंची जीभ आणि नालीसारखी कुसव छिद्रे केली आहेत. याशिवाय विविध प्रकारची बारकाव्यांनी नटलेली युद्धशिल्पे कोरण्यात आली आहेत. तिसर्‍या मजल्यावर वैशिष्ट्यपूर्ण आरसे महाल असून महालातील दगडी फरशी व भिंती आरशासारख्या गोठीव करण्यात आल्या आहेत. यामुळे यात प्रतिबिंब दिसते. आरसे महालाच्या सभोवती छोटी गच्ची असून इमारतीवर कोल्हापूर संस्थानचा जरीपटका (ध्वज) फडकत असतो. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर रोमण आकड्यातील घड्याळ आजही सुस्थितीत वेळ सांगत आहे.

इंग्रज राजवटीपूर्वी बांधण्यात आलेल्या नगारखान्यात मराठा, द्रविडी, मुरीश, रोमन, राजस्थानी या मिश्र शैलीतील स्थापत्याचा समावेश असल्याने त्या त्या शैलीतील विविधता इमारतीच्या बांधकामात एकवटली आहे.
-अजित जाधव, वास्तुशास्त्रज्ञ
जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या नगारखान्याच्या स्थापत्यात इंडो सारसेनिक व निओ मुघल शैलीचा प्रभाव दिसतो. कोल्हापूरचे वैशिष्ट्यपूर्ण वारसास्थळ म्हणून याचे जतन-संवर्धन-संरक्षण अत्यावश्यक आहे.
-रसिका कंदले-पाटील, आर्किटेक्ट

जोतिबा डोंगर परिसरातील दगडाचा वापर

उत्तर भारताच्या राजस्थानातील कसबी कलाकारांसह स्थानिक कारागिरांच्या मदतीने नगारखान्याची इमारत बांधण्यात आली. यासाठी दख्खनचा राजा जोतिबा डोंगर परिसरातील दगडाचा वापर करण्यात आला. दगडाचे काम करणार्‍या पाथरवटांना दरमहा 25 ते 30 रुपये मजुरी दिली जात होती. जोतिबा डोंगरावरील घोटीव दगड कोल्हापुरात आणण्यासाठी तब्बल 5 हजार कामगार अखंड सक्रिय होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news