

नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील संभाजी नगर परिसरात असलेल्या 'सहारा प्लास्टिक स्क्रॅप' गोदामाला आज भीषण आग लागली. या दुर्घटनेत गोदामातील कोट्यवधी रुपयांचे प्लास्टिक आणि इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले आहे: गोदामात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले.
आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, ८ ते १० किलोमीटर अंतरावरून धुराचे आणि आगीचे मोठे लोट स्पष्ट दिसत होते. हा भीषण देखावा पाहून परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका, स्थानिक नगरपालिका आणि आसपासच्या परिसरातील अग्निशामक दलाच्या गाड्यांना तातडीने पाचारण करण्यात आले.
परिस्थिती गंभीर: प्लास्टिकचे ज्वलनशील साहित्य आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग अधिकच भडकली असून, त्यावर नियंत्रण मिळवणे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, गोदामातील साहित्याचे अतोनात नुकसान झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे अचूक कारण अजून समजू शकलेले नाही.