नागाव : येथील आंबेडकर नगरसमोरील सेवा रस्त्यावर दोन मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्याचे नाव इकबाल शेख (वय : ५२ वर्षे, रा. टेबंलाईवाडी ता. करवीर) असे आहे. तर या अपघातात अन्य दोन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची नावे समर्थ विजय चौगुले व एकाचे नाव भोसले (पुर्ण नाव समजू शकले नाही). हा अपघात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नागाव येथील आंबेडकर नगरसमोरील सेवा रस्त्यावरून रात्री अकराच्या सुमारास दोन मोटारसायकली भरधाव वेगाने जात होत्या. अचानक दोन्ही वाहनांवरील ताबा सुटल्याने त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात ठार झालेले इकबाल शेख हे शिरोली एमआयडीसी परिसरात असलेल्या एका ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तर अपघातातील जखमी युवक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून शिवनेरी काँलनीतील आपल्या घरी निघाले होते. या दोन मोटारसायकलीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. शिरोली एमआयडीसी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.