

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावात आता लवकरच संगीत कारंजा सुरू होणार आहे. ठेकेदार कंपनीच्या वतीने गुरुवारपासून (दि. 21) कारंजा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे कोल्हापूरकरांचे रंकाळ्यात संगीत कारंजाचे स्वप्न साकारणार आहे. त्यामुळे कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असलेला रंकाळा अधिकच नयनरम्य होऊन वैभवात भर पडणार आहे. कोल्हापूरचे नवे आकर्षण केंद्र ठरणार आहे.
सुमारे 50 मीटर बाय 12 मीटर फ्लोटिंग असणार आहे. त्यापैकी बलाढ्य पाच टन क्रेनच्या सहाय्याने गुरुवारी दहा मीटरचे फ्लोटिंग पाण्यात सोडण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी त्याचे व्हिडीओ केले. त्यामुळे सोशल मीडियावर रंकाळ्यातील संगीत कारंजाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारंजाची उत्सुकता आतापासूनच सुरू झाली आहे.
रंकाळा टॉवरपासून सुमारे वीस मीटर आत कारंजा असेल. कारंजाची लांबी 24 मीटर आहे. तसेच, सुमारे 15 मीटर उंचीपर्यंत कारंजातील पाणी उडेल. रंगीबेरंगी लाईट इफेक्ट असतील. कारंजातून कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनात आणखी मोठी भर पडेल. कोल्हापूरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असल्याने रंकाळा नाईट डेस्टिनेशन ठरण्याची शक्यता आहे.
* रंकाळा टॉवरपासून 20 मीटर आत कारंजा
* कारंजाची लांबी 24 मीटर अन् उंची 25 मीटर
* अत्याधुनिक लाईट इफेक्टने रंकाळा उजळणार
* कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती कारंजारूपात
* रस्त्यावरून कारंजा दिसणार नाही, याची दक्षता