

कोल्हापूर : पाच कोटी रुपये खर्चून रंकाळ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या संगीत कारंजाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. ९ ऑगस्टला उद्घाटनाच्या वेळी अवघ्या १५ मिनिटांसाठी कारंजा सुरू करून दाखविण्यात आला; त्यानंतर मात्र कारंजात पाण्याचा फवारा दिसलेलाच नाही. उद्घाटन झाल्याची माहिती शहरभर पसरल्याने कारंजा पाहण्यासाठी रंकाळ्यावर येणाऱ्या नागरिक आणि पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे. त्यामुळे ‘उद्घाटनाची केली घाई, रंकाळ्यातील कारंजात पाणीच नाही,’ असे चित्र सध्या दिसत आहे.
कारंजाचे स्ट्रक्चर उभारण्याचे काम गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू आहे. प्रकाशयोजना, संगीत आणि पाण्याच्या फवाऱ्यांच्या माध्यमातून रंकाळ्याच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे कारंजा सुरू होण्याची नागरिकांना उत्सुकता होती. मात्र, ९ ऑगस्टला कारंजा केवळ उद्घाटनापुरता सुरू केला आणि त्यानंतर तांत्रिक कामाच्या अपूर्णतेमुळे बंदच आहे. उद्घाटनानंतर नियमितपणे कारंजा सुरू राहील, अशी अपेक्षा नागरिकांची होती. प्रत्यक्षात उद्घाटनाच्या औपचारिकेनंतर आजतागायत कारंजा बंदच आहे.