

कोल्हापूर : साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत शेतकरी संघटनांशी चर्चा करावी लागेल, शासनाची भूमिका त्यांना सांगितल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यात सणासुदीच्या तोंडावरच फार मोठी साखरटंचाई निर्माण झाली. साखरेचा प्रतिकिलोचा दर ६०-७० रुपयांवर गेला. यामुळे सरकारला हे पाऊल उचलावे लागलेले आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे शेतकरी संघटनांचा ऊस दरावरून याला विरोध आहे. याबाबत विचारता मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्यावर्षी प्रतिटनाला ३,४०० रुपये दिले होते, १०० रुपये द्यायचे राहिले होते. अनेक कारखाने ते देत आहेत. साखरेचा वाढलेला दर हा कृत्रिम होता. दोनच दिवसांसाठी तो वाढला आणि आता परत खाली आला. साखरेच्या दरावर ऊस दर मागत असतील, तर त्यांच्याशी बसून चर्चा करावी लागेल. त्यांना समजावून सांगावे लागेल की, कारखान्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही.’
एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीनंतर आम्ही कष्ट करतो, मरमर मरतो आणि अशा पद्धतीने अन्याय होतो, अशी विद्यार्थ्यांची झालेली भावना काढून टाकण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांना शिक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री पाऊल उचलतील.
‘वनतारा’प्रमाणे ‘माधुरी’च्या पालनपोषणाची सर्वांची जबाबदारी
माधुरी हत्तीण परत येत आहे, याबाबत विचारता मंत्री मुश्रीफ म्हणाले, माधुरी हत्तिणीचे आपण सर्वजण मिळून स्वागत करूया. ज्याप्रमाणे तिचे ‘वनतारा’मध्ये पालनपोषण झाले त्याच पद्धतीने पालनपोषण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.