

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलच्या राजकारणाने आणखी एक वळण घेतले असून समरजित घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या बैठकीत नेत्यांसमोर त्यांनी आपले समर्थक हे भाजपच्या चिन्हावर लढतील असे स्पष्ट केले. घाटगे यांच्या महायुतीच्या बैठकीतील उपस्थितीबाबत शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांनी आश्चर्य व्यक्त करताच भाजपच्या नेत्यांकडून राजे आपल्यासोबतच असल्याची सारवासारव करण्यात आली. तो बैठकीत चर्चेचा विषय ठरला. कागल तालुक्यात नगरपालिका निवडणुकीत हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली होती. तर संजय मंडलिक स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. त्याचाच पुढील अध्याय जिल्हा परिषद निवडणुकीत गिरविला जाण्याची शक्यता आहे. संजय मंडलिक यांनी वगळून हसन मुश्रीफ, समरजित घाटगे व संजय घाटगे एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणार्या कागलच्या राजकारणात नेहमीच काहीतरी वेगळे घडत असते. त्याची सुरुवात यावेळी नगरपालिका निवडणुकीत झाली. एकमेकांवर वैयक्तिक आरोप करून राजकीय वैर टोकाला नेणारे हसन मुश्रीफ व समरजित घाटगे हे कागल तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीत वैर विसरून एकत्र आले याचा अनेकांना धक्का बसला. त्यापूर्वी भाजप सोडून शरद पवार राष्ट्रवादीकडून घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. विधानसभेतील विरोधक नगरपालिका निवडणुकीत एकत्र आले. आता राजे पुन्हा भाजपात प्रवेश करत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक पूर्वतयारीसाठी महायुतीची रविवारी बैठक झाली. या बैठकीतच थेट समरजित घाटगे आले. बैठकीत हजर असलेले संजय मंडलिक यांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त करत घाटगे येथे कसे? त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला का? अशी विचारणा करताच उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी राजे आता आपल्यासोबतच असल्याची सारवासारव केली. यावेळी मंडलिक यांनी जिल्हा परिषदेच्या दोन जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली. तर समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश ही केवळ तांत्रिक बाब असून तो केंव्हाही होऊ शकतो, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
संजय मंडलिक-संजय घाटगे चर्चा, पण...
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना वगळून हसन मुश्रीफ, समरजित घाटगे व संजय घाटगे अशी युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुश्रीफ व समरजित नगरपालिकेच्या राजकारणात एकत्र आले होते. त्या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी संजय घाटगे यांची भेट घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर संजय घाटगे गटाचे मेळावेही सुरू झाले. आता अचानकपणे समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाने सगळ्याच राजकारणाला वेगळे वळण लागले आहे.