MLA Satej Patil | मुश्रीफांकडून महायुतीचा सतत जागर; गोकुळबाबत त्यांनीच बघून घ्यावे

Satej Patil
Satej Patil | Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सातत्याने महायुती, महायुती, महायुती, महायुती असा जागर केला आहे. त्यामुळे गोकुळबाबत सद्यस्थितीत त्यांनीच बघून घ्यावे, असा टोला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. दरम्यान, महायुतीतील अंतर्गत वादाचा फटका गोकुळ दूध संघास बसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आमदार पाटील म्हणाले, सरकारने ‘अ’ वर्ग संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपताच प्रशासक नेमण्याचा कायदा केला आहे. त्यामुळे सरकार पाच तारखेला काय भूमिका घेणार यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संचालक मंडळास मुदतवाढ देणार की, प्रशासक नेमणार या सरकारच्या निर्णयावर नंतर भूमिका घेऊ. वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी सतत महायुतीचा जागर केला आहे. प्रत्येक ठिकाणी महायुतीच अशी भूमिका घेतली आहे. सध्या गोकुळ दूध संघाबाबत त्यांच त्यांनी बघून घ्यावे.

आमदार पाटील म्हणाले, न्यायलयाने 85 दिवसांत दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करून नंतर निवडणूक घ्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीस अवधी लागणार आहे. त्यामुळे सरकारची भूमिका काय असेल ते बघूया. शासनाचे धोरण काय असेल याचा अभ्यास करून आपल्यास पुढील दिशा ठरवावी लागेल. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कोल्हापूर महापालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, संजय कांबळे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, सरलाताई पाटील, भारती पोवार,गोकुळचे संचालक बाळासाहेब चौगले, चेतन नरके, प्रकाश पाटील, विनायक घोरपडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news