

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी आमदारांची फिल्डिंग सुरू आहे. महायुतीच्या तीनही पक्षांनी संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी तयार केली असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ व शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव असल्याचे समजते.
पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने सर्व दहाच्या दहा जागा जिंकून भगवा रोवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेना शिंदे गट वरचढ आहे. त्यांचे चार आमदार निवडून आले आहेत. भाजपचे 2 आमदार निवडून आले असून एका अपक्षाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची संख्या तीनवर गेली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 1 आमदार निवडून आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोल्हापुरातून कोणाला स्थान मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आलेल्या चार आमदारांपैकी प्रकाश आबिटकर यांनी हॅट्ट्रिक केली आहे. अत्यंत चुरशीची लढत राधानगरी मतदारसंघात झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती. यावेळी त्यांनी आबिटकर यांना तुम्ही आमदार करा, मी लाल दिवा देतो, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंत्रिपदासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व आ. चंद्रदीप नरके यांनी या निवडणुकीत बाजी मारत पुनरागमन केले आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर दुसर्यांदा निवडून आले आहेत. परंतु महाविकास आघाडीत ते मंत्री होते. शिंदे शिवसेनेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. परंतु अखेर पर्यंत त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने केलेल्या मंत्र्यांच्या यादीत कोल्हापुरातून राजेश क्षीरसागर यांचे नाव असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. मुश्रीफ हे सहाव्यांदा निवडून आले आहेत. पक्षामध्ये देखील ते ज्येष्ठ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलेल्या संभाव्य मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत हसन मुश्रीफ यांचे नाव असल्याचे समजते.
भाजपने तयार केलेल्या पहिल्या यादीमध्ये कोल्हापुरातील आमदारांचे नाव नसल्याचे समजते. सांगली जिल्ह्यातील गोपीचंद पडळकर यांच्या नावाची मात्र चर्चा आहे.