

कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू आघाडीचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व नगरसेवकपदाचे 23 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून साऊंड सिस्टीमच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता प्रताप माने यांना 14 हजार 789 तर त्यांच्या विरोधात (शिंदे शिवसेना) संजय मंडलिक गटाच्या युगंधरा महेश घाटगे यांना 7 हजार 199 इतकी मते मिळाली. 7 हजार 590 इतक्या मताने सविता माने या विजयी झाल्या.
कागल नगरपालिकेची निवडणूक विविध कारणाने लक्षवेधी ठरली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांची अनपेक्षितपणे आघाडी झाली. त्यावेळी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आणि निवडणुकीला नवा ट्विस्ट निर्माण झाला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस यांनीही या निवडणुकीमध्ये भाग घेतला. नगराध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी झाली.
मतमोजणीवेळी प्रत्येक फेरीमध्ये राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांना मतदान वाढत होते. प्रत्येक उमेदवार 700 ते 800 मतांच्या फरकाने विजयी झाला. यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर 1716 इतक्या उच्चांकी मतांनी निवडून आले. मतमोजणीनंतर प्रभागातील निवडून आलेले उमेदवार मोटारसायकल रॅलीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाजतगाजत येत होते. तिथून सर्व उमेदवार मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीने गैबी चौकात दाखल झाले. तेथून निपाणी वेशीपर्यंत विजय मिरवणूक काढण्यात आली.
मतमोजणीपूर्वीच विजयी उमेदवारांचे फलक...
मतमोजणी दिवशी पहाटेपासूनच कागल शहरात ठिकठिकाणी प्रमुख चौकाचौकांत राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीतील विजयी उमेदवारांचे लावण्यात आलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच शनिवारी अमावस्या दिवशी मतमोजणी ठिकाणी लिंबू, सुया, बिबे टाकण्याचे प्रकार देखील दिसून येत होते.
पोलिसांचा दोन वेळा सौम्य लाठीचार्ज
खर्डेकर चौक येथे गाडीत बसण्याच्या कारणावरून तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून तरुणांना पांगवले. तसेच गैबी चौकात देखील डॉल्बीच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी देखील पोलिसांनी किरकोळ लाठी चार्ज करून तरुणांना बाजूला केले.