

विकास कांबळे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे, गोकुळचे अध्यक्षपद त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्याकडे, त्या पाठोपाठ आता कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपदही आपले कार्यकर्ते सूर्यकांत पाटील यांच्याकडे सोपवत जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांवर मुश्रीफ यांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे सहकारात ‘कागल राज’ सुरू झाले आहे.
सहकारामध्ये राजकारण बाजूला ठेवून आपण एकत्र येत असल्याच्या वल्गना नेते कितीही करत असले तरी ते पूर्णसत्य नाही. सहकारातील सत्तेसाठी केलेल्या त्या तडजोडी असतात, असे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत दिसून आले आहे. अनेकजणांची राजकीय सुरुवात सहकारी संस्थांच्या माध्यमातून झाली आहे. आजदेखील अनेक आमदार जिल्हा बँक किंवा साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, बाजार समिती या सहकारी संस्था महत्त्वाच्या मानल्या जातात. तालुक्याच्या राजकारणात सहकारी साखर कारखान्यांना महत्त्व असते. कारण साखर कारखान्याचा अध्यक्ष हा त्या मतदारसंघाचा भावी आमदार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या सहकारी संस्था पूर्वीपासून काँग्रेसच्या ताब्यात होत्या. परंतु गेल्या दोन दशकापासून राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. लेबल बदलले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती आणि शेतकरी संघ या चार महत्त्वाच्या सहकारी संस्था. या चारही ठिकाणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, यांची आघाडी आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील आमदार, खासदारही आहेत. आघाडी करत असताना प्रत्येक गटाला संधी मिळणे अपेक्षित आहे. परंतु गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीपासून हे समीकरण बदलले. गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ऐनवेळी महायुतीचे राजकारण घुसविण्यात आले आणि आमदार सतेज पाटील यांना बाजूला करण्यात आले. सतेज पाटील आमच्या सोबत आहेत, असे आघाडीतील नेते कितीही म्हणत असले तरी पदाच्या वेळी मात्र त्यांनी सोयीची भूमिका घेतल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जिल्हा बँक आणि गोकुळचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना शिंदे गटासाठी बाजार समितीचे सभापतिपद मागितले होते. दुसरीकडे आघाडीची सत्ता असलेल्या संस्थांमध्ये सतेज पाटील गटाचा एकाही संस्थेत अध्यक्ष किंवा सभापती नाही. त्यामुळे बाजार समिती सभापती निवडीत ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ पालकमंत्री आबिटकर यांच्या मागणीला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा होती. आबिटकर आणि त्यांचे राजकीय पटत नसेल, परंतु मुश्रीफ यांचे सतेज पाटील यांच्याशी तरी पटते. त्यामुळे मुश्रीफ यांना पाटील गटाला सभापतिपद देता आले असते.
मुश्रीफ यांनी आपले मन मोठे करावयास हवे होते. परंतु तसे झाले नाही. मुश्रीफ यांनी बाजार समितीमध्ये देखील कागलचा सभापती करून जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची सूत्रे आपल्याकडे ठेवली आहेत.
* जिल्हा बँक, गोकुळनंतर बाजार समितीवर कागलचा कब्जा
* आघाडीत सातजण; पदासाठी फक्त राष्ट्रवादी अजित पवार गट
* महायुतीच्या घुसखोरीमुळे सतेज पाटील गोकुळमधून आघाडीतून बाहेर
* पालकमंत्र्यांची मागणी धुडकावत बाजार समिती सभापतिपद कागललाच