

प्रा. सुनील डेळेकर
मुरगूड : मुरगूड नगरपालिकेची निवडणूक ही राजकीय सत्तासंघर्षातून झालेली निवडणूक आहेच. शिवाय, राजकीय उट्टे काढणारी आणि राजकीय ईर्ष्या टोकाला नेणारी होती. मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यातील संघर्षाची किनारही या निवडणुकीत पाहायला मिळाली.
2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकारणाचे उट्टे काढण्यातून मुरगूड पालिका निवडणुकीला चांगलाच रंग भरला. कोणी व कसा दगा दिला, याचे गणित मांडत पालिका निवडणुकीची व्यूहरचना बदलत गेली. त्यामुळे जवळचे लांब गेले व लांबचे जवळ आले. सन 2011 पासून 2016 पर्यंत माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांची पालिकेवरील सत्ता काढून घेत मंडलिक गटाने सन 2016 ची निवडणूक जिंकत पालिकेवर एक हाती सत्ता राखली. कारण, पालिकेच्या राजकीय वर्तुळात आतापर्यंत मंडलिक - पाटील असाच संघर्ष पाहायला मिळाला.
माजी खासदार संजय मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांना राजकीय शह देण्याच्या उद्देशाने मंत्री मुश्रीफ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व्यूहरचना करायला सुरुवात केली. यातूनच त्यांनी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजित पाटील व माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना आपल्या तंबूत आणले व बेरजेच्या राजकारणासाठी समरजित घाटगे यांच्याशीही राजकीय सोयरीक केली, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुरगूड पालिकेची सत्ता खेचण्याचा त्यांचा मनसुबा या निकालाने धुळीस मिळाला. माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके यांचा पराभव मंडलिक गटाला जिव्हारी लागणारा आहे. मुश्रीफ गटाला मात्र या निवडणुकीने आत्मपरीक्षण करायला भाग पाडले असून, त्यांना आगामी राजकीय काळात बर्याच डागडुजी कराव्या लागणार आहेत. मंडलिक गटाला मात्र पालिका निवडणुकीतील यशामुळे उभारी मिळाली असून, त्यांचा राजकीय प्रभाव तालुक्याच्या राजकारणावर व आगामी जि. परिषद, पं. समिती निवडणुकींवरही परिणाम होणार, यात तिळमात्र शंका नाही.
महायुतीत बिघाडी
शिवसेना (शिंदे गट) भाजप व राष्ट्रवादी या राज्याच्या महायुतीतील घटक पक्षामुळे मंडलिक - मुश्रीफ व पाटील हे महायुती म्हणून पालिका निवडणूक लढतील, असे सूतोवाच निवडणुकीपूर्वी होते; पण लोकसभा व विधानसभा निवडणुकीची किनार आडवी आल्याने मंत्री मुश्रीफांनी आपली स्वतंत्रच भूमिका या पालिका निवडणुकीत घेत संजय मंडलिक व प्रवीण पाटील यांना आव्हान दिले होते. महायुतीतच बिघाडी झाल्याने ही निवडणूक महायुती अंतर्गतच राजकीय उट्टे काढणारी ईर्ष्येची झाली.