

हातकणंगले : भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या सचिन बाबासो कांबळे (रा. माळभाग, आंबेडकरनगर, रुई) या युवकावर काठी, दगड आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. ही घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री सव्वानऊच्या सुमारास अण्णाभाऊ साठे नगर येथे घडली. जखमी सचिन कांबळे याचा कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला.
दरम्यान, सचिन कांबळे याच्या मृत्यूनंतर रुई गावामध्ये सकाळी तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मोठा पोलिस फाटा तैनात केला होता. त्यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी अक्षय कांबळे यांच्या घरी कार्यक्रम असल्याने अक्षय कांबळे व गणेश कोठावळे हे मिठाई आणण्यासाठी रूईहून इचलकरंजीला गेले होते. मिठाई घेऊन इचलकरंजीहून रूईकडे येत असताना कामगार चाळीजवळ रस्त्याच्या एका बाजूने संविधान रॅली निघाली होती. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे तुषार साठे, आदर्श साठे, जयदीप साठे, नोहा माने, प्रेम साठे व इतर अनोळखी 15 जणांनी गणेश कोठावळे व अक्षय कांबळे यांना अडवले. आम्हाला मागील भांडणाचा राग असून त्यावेळी तुझा भाऊ वाचला होता, मात्र यावेळी तुलाही सोडणार नाही आणि तुझ्या समाजातील चार ते पाच लोकांनाही संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी देऊन अंगावर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरून गणेश व अक्षय तेथून मोटारसायकलवरून निघून आले. घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी सचिन कांबळे, विजय जिरगे यांना सांगितले.
रूई येथील माने नगरमधील पाण्याच्या टाकीजवळ शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अनिल विठ्ठल साठे यांच्या नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम होता. त्यावेळी संदीप कांबळे, सचिन कांबळे, संतोष कांबळे, विनोद कांबळे यांनी गुरुवारी रात्री झालेल्या घटनेची माहिती अनिल साठे यांना दिली. यावेळी अनिल साठे यांनी रात्री नऊच्या सुमारास कुमार विद्यामंदिर येथे बोलावून प्रकरण मिटवूया असे सांगितले. त्यानंतर संदीप कांबळे, सचिन कांबळे, विजय जिरगे, सुधीर कांबळे, राजू कांबळे, संतोष कांबळे हे अनिल साठे यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी अनिल साठे यांच्याशी चर्चा करून हे सर्वजण रात्री सव्वानऊच्या सुमारास अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ गेले. त्यावेळी त्याठिकाणी नंदकुमार साठे, अनिल साठे, जितेंद्र यादव, अशोक आदमाने यांनी पुढाकार घेत सोबत असलेल्या जयदीप साठे, रोहित साठे, तुषार साठे, आदर्श साठे, अनुष साठे, नोहा माने, नीलेश साठे, दिलीप साठे, राज साठे, रितेश साठे, सचिन शिंदे, सौरभ भिंगारे, राज साठे व अनोळखी चार ते पाचजण काठी, वासा, दगड, लोखंडी गज, तलवारसारखे धारदार शस्त्र घेऊन आले. यावेळी नंदू साठे, अनिल साठे, जितेंद्र यादव, अशोक आदमाने यांनी या सर्वांना उद्देशून मारा, यांना सोडू नका, काय होईल ते आम्ही पाहतो, असे सांगितले. यावेळी सचिन कांबळे यांनी आपण भांडण मिटविण्यासाठी बोलावले आहे, असे म्हणताच या चौघांनी प्रथम याला संपवा, असे म्हटल्यानंतर जयदीप व रोहित साठे यांनी काठीने तर तुषार साठे यांनी लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी आदर्श साठे, अनुज साठे, प्रेम साठे, नीलेश साठे, शुभम हेगडे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी संदीप कांबळे व विजय जिरगे यांना नोहा माने, दिलीप साठे, राज साठे, रितेश साठे, सचिन शिंदे, सौरभ भिंगारे यांच्यासह अनोळखी चौघांनी काठी, दगड, लोखंडी गज व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत सचिन कांबळे हा गंभीर जखमी झाला.
सचिन याला हातकणंगले पोलिस ठाणे येथे आणले. योग्य सुविधा नसल्याने सचिन यास कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे अडीचच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच रूई येथील सचिनच्या नातेवाईकांसह परिसरातील युवकांनी सीपीआर रुग्णालयाकडे धाव घेतली. सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर मृत सचिन बाबासो कांबळे याच्या नातेवाईकांनी गर्दी करत आरोपींना तत्काळ अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने सीपीआर परिसरामध्येही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी रुग्णालयाबाहेर बंदोबस्त तैनात केला याची फिर्याद हातकणंगले पोलिसांमध्ये संदीप सूर्यकांत कांबळे यांनी दिली आहे. नंदकुमार बळी साठे, अनिल विठ्ठल साठे, जितेंद्र चिंतू यादव, अशोक आदमाने, जयदीप अनिल साठे, रोहीत दगडू साठे, तुषार इस्त्राईल साठे, आदर्श इस्त्राईल साठे, अनुश साठे, नोहा माने, प्रेम साठे, निलेश अनिल साठे, दिलीप गुंडा साठे, राज आनंदा साठे, रितेश मोहन साठे, सचिन विलास शिंदे, सौरभ भिंगारे, राज मोहन साठे (रा. सर्वजण साठेनगर, रूई) या 18 जणांसह अनोळखी चार ते पाच जणांवर हातकणंगले पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सचिनच्या मृत्यूची माहिती समजताच रुई येथील म्हसोबा माळभाग परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने म्हसोबा माळ व साठेनगर येथे मोठी कुमक तैनात केली. त्यामुळे गावामध्ये पोलिस छावणीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी सचिन याचा मृतदेह गावामध्ये आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला.