राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार

Maharashtra Assembly Polls : हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांचा विश्वास
Muralidhar Mohol
मुरलीधर मोहोळ
Published on
Updated on

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने राज्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मंत्री मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत महाराष्ट्रात विकासकामांसाठी दहा लाख कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून रेल्वे, रस्ते विमानतळ यांचा विकास झाला. एक लाख कोटी रुपये रेल्वेच्या विकासासाठी दिले. सध्या 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. साखर कारखान्यांवर लादलेला आयकर रद्द करून शेतकर्‍यांना न्याय दिला. केंद्र सरकारच्या योजनांचा समाजातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त जनतेला लाभ मिळाला आहे. जगात दहाव्या क्रमांकावर असणारी भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. म्हणूनच मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी जनतेने विराजमान केले.

मंत्री मोहोळ म्हणाले, राज्यातील डबल इंजिन सरकारनेही राज्यात वेगाने विकास केला. परकीय गुंतणुकीतील 52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेचा खोटा प्रचार करणारे विरोधक तोंडावर पडले आहेत. योजना बंद पडणार म्हणणार्‍यांनी आपल्या जाहीरनाम्यात हीच योजना आणली आहे. जनता विकासाला आणि प्रगतीला मत देते. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात महायुती बाजी मारेल.

महायुतीत मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा नाही. महाविकास आघाडीत अनेक चेहरे स्पर्धेत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यानी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. आता मात्र मराठा आरक्षणावरून राजकारण केले जात आहेत. खा. महाडिक यांनी माफी मागून स्पष्टीकरण दिल्याने या विषयावर बोलणार नाही, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते.

20 वर्षांत कोल्हापूरचा विकास झाला नाही

मंत्री मोहोळ म्हणाले, शिक्षण, कुस्तीसाठी मी कोल्हापुरात वास्तव्यास होतो. कोल्हापूर हे माझ्या आवडीचे ठिकाण आहे; पण गेल्या वीस वर्षांत क्षमता असूनही या शहराचा फारसा विकास झाला नाही. कचरा, पिण्याचे पाणी, रस्ते हे प्रश्न सुटले नाहीत. जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍यांना आणि वर्षानुवर्षे महापालिकेत सत्ता असणार्‍यांनी यासाठी काहीच केले नाही. एकहाती सत्ता असूनही त्यांना हे प्रश्न सोडवता आले नाहीत. आता जनता त्यांना बाजूला करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news